कल्याण डोंबिवली च्या महापौरपदी  विनिता विश्वनाथ राणे  बिनविरोध 

मात्र या निवडीवरून पक्षांतर्गत संघर्ष उफाळून आलाय 

कल्याण : रायगड माझा वृत्त

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर पदी शिवसेनेच्या विनिता विश्वनाथ राणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. एकीकडे बिनविरोध निवडीचा आनंद असताना शिवसेनेत मात्र या निवडीवरून पक्षांतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. 

मुंबई आणि ठाण्याला जोडून असणारे कल्याण डोंबिवली म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. गेली अनेक वर्ष या महानगरपालिकेची सत्ता शिवसेनेच्या ताब्यात आहे. विद्यमान महापौर यांची मुदत संपल्याने पुढील अडीच वर्षासाठी महिलांसाठी राखीव असलेल्या  महापौर पदासाठी शिवसेनेमध्ये  जोरदार स्पर्धा होती. डझनभर महिला नगरसेविकांची नावे चर्चेत होती. परंतु या निवडणुकीत पक्ष नेतृत्वाने विश्वनाथ राणे यांच्या पत्नी विनिता राणे यांना उमेदवारी दिली.  गेले दोन दिवस यावरून शिवसेनेत  धुसफुस व नाराजी उफाळून आली.  काही जणांनी तर राजीनामे देण्याची तयारी केली असल्याचे बोलले जात होते. अखेर या सर्व संघर्षावर मात  करीत विनिता राणे या कल्याणच्या महापौरपदी  विराजमान झाल्या आहेत. त्यांच्या निवडीमुळे कल्याण डोंबिवली शहराचे महापौरपद कल्याणकडून डोंबिवलीकडे गेले आहे. विनिता  राणे  यांचे  पती विश्वनाथ राणे हे पूर्वीचे काँग्रेस नेते होते. मागील काळात ते विरोधी पक्षनेते राहिले होते. प्रभावशील व्यक्तिमत्व असलेल्या विश्वनाथ राणे यांनी मागील निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेतील त्यांचे वाढते वजन पाहता आगामी काळात शिवसेनेकडून  ते विधानसभा लढण्याची शक्यता देखील नाकारता  येत नाही

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.