कल्याण-डोंबिवली महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपदी शिवसेनेचे दीपेश म्हात्रे

कल्याण : रायगड माझा वृत्त

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी शिवसेनेचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांची निवड झाली. मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली आज निवडणूक पार पडली. दीपेश म्हात्रे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा कुर्वे यांनी केली. निवडीनंतर शिवसैनिकांनी कल्याण-डोंबिवलीत जल्लोष केला.

स्थायी समिती सभापती आणि महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी आज निवडणूक कार्यक्रम पार पडला. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या. स्थायी समिती सभापतीपदासाठी शिवसेनेचे दीपेश म्हात्रे तर महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी भाजपच्या रेखा चौधरी यांची निवड झाली. निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱयांचे शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महापौर विनिता राणे, सभागृह नेते श्रेयस समेळ, गटनेते दशरथ घाडीगावकर, माजी महापौर पुंडलिक म्हात्रे, राजेंद्र देवळेकर, रमेश जाधव, वामन म्हात्रे आदी उपस्थित होते.

स्वच्छता, आरोग्य, वाहतूक व्यवस्था सुधारणार
स्थायी समिती सभापतीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना दीपेश म्हात्रे म्हणाले, कल्याण-डोंबिवलीसह 27 गावांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जाईल. प्रमुख अधिकाऱयांवर कामाची जबाबदारी निश्चित करण्यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा झाली आहे. यामुळे स्वच्छता, आरोग्य, वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होणे सोपे जाणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत