कसोटी क्रमवारीत सचिन तेंडुलकरनंतर अव्वल स्थानी येणारा विराट पहिला भारतीय

मुंबई : रायगड माझा वृत्त

इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना चौथ्याच दिवशी गमावला असला तरी भारतीय कर्णधार विराट कोहलीसाठी समाधान देणारी घटना घडली. कसोटी क्रमवारीत तो प्रथमच अव्वल आला असून, २०११ मध्ये सचिन तेंडुलकरनंतर अव्वल स्थानी येणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पराभव झाला असला तरी, कोहलीने १४९ आणि ५१ धावा केल्या. त्यामुळे त्याच्या गुणसंख्येत ३१ ने वाढ झाली. त्याने ऑस्ट्रेलियाच्या स्टीव स्मिथला मागे टाकले. स्मिथ या अव्वल स्थानावर ३२ महिने होता. चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणानंतर स्मिथवर एका वर्षाची बंदी आहे. कोहली इंग्लंडविरुद्ध अजून चार कसोटी खेळणार असून, त्याला अव्वल स्थान अधिक भक्कम करण्याची संधी आहे.

कोहलीच्या अगोदर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, गौतम गंभीर, सुनील गावसकर, वीरेंद्र सेहवाग आणि दिलीप वेंगसरकर या भारतीयांनी कसोटी क्रमवारीत पहिला क्रमांक मिळवलेला आहे.

अव्वल क्रमांक मिळवताना कोहलीचे ९३४ गुण झाले आहेत. पुढील चार कसोटींत त्याने या शानदार कामगिरीत सातत्य राखले तर सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या मॅथ्यू हेडन, जॅक्‍स कॅलिस, एबी डिव्हिलियर्स यांना तो मागे टाकू शकेल. या तिघांनी ९३५ गुणांचा टप्पा गाठला होता, तर सर्वांत जास्त गुण डोनाल्ड ब्रॅडमन (९६१) आणि स्टीव स्मिथ (९४७) यांनी मिळवलेले आहेत.

पहिल्या कसोटीत भारतीय संघात स्थान न मिळवणारा चेतेश्‍वर पुजारा कसोटी क्रमवारीत सहाव्या स्थानी कायम आहे. पहिल्या दहा स्थानांत विराट आणि पुजारा हेच दोघे भारतीय आहेत.

पहिल्या कसोटीतील इंग्लंडच्या विजयात प्रामुख्याने गोलंदाजीत निर्णायक कामगिरी करणारा इंग्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज सॅम करनने १५२ वरून थेट ७२ क्रमांकावर झेप घेतली आहे. गोलंदाजीच्या क्रमवारीत इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. रवींद्र जडेजा तिसऱ्या, तर आर. अश्‍विन पाचव्या स्थानी कायम आहेत.

फलंदाजीची क्रमवारी 
१) विराट कोहली (९३४)
२) स्टीव स्मिथ (९२९)
३) ज्यो रूट (८६५)
४), केन विलिमसन (८४७)
५) डेव्हिड वॉर्नर (८२०)
६) चेतेश्‍वर पुजारा (७९१)
७) करुणाकत्ने (७५४)
८) दिनेश चंदिमल (७३३)
९) डिन एल्गर (७२४)
१०) एडियन मार्करम (७०३)

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत