कसोटी क्रिकेटमध्ये नाणेफेक रद्द होणार?

मुंबईत होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत होणार निर्णय!

मुंबई : रायगड माझा वृत्त 

कोणत्याही सामन्याआधी होणारी नाणेफेक ही बऱ्याचवेळा संघाचा निकाल ठरवत असते. कसोटी क्रिकेटमध्ये नाणेफेकीला अत्यंत महत्वाचं स्थान आहे, यजमान संघ खेळपट्टीचं रुप पाहून प्रथम फलंदाजी करायची की गोलंदाजी हे नाणेफेकीनंतर ठरवत असतो. मात्र आयसीसीच्या अंतर्गत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आगामी काळात कसोटी क्रिकेटमध्ये नाणेफेक रद्द होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये पाहुण्या संघाच्या कर्णधाराला प्रथम फलंदाजी करायची आहे की गोलंदाजी याचं स्वातंत्र्य दिलं जाऊ शकतं.

आतापर्यंत अनेक प्रसंगांमध्ये, यजमान संघाच्या जमेच्या बाजू लक्षात ठेऊन खेळपट्टी बनवली जात असे. अशा प्रकारे काम करणं ही चुकीची गोष्ट नसली तरीही अनेकदा कसोटी सामने एकतर्फी होतात. “कसोटी सामन्याची खेळपट्टी तयार करताना यजमान संघाचं मत विचारात घेतलं जाण हा सध्या कळीचा मुद्दा बनलेला आहे. त्यामुळे बहुतांश सदस्यांनी नाणेफेकीऐवजी पाहुण्या संघाच्या कर्णधाराला गोलंदाजी किंवा फलंदाजी निवडण्याचा अधिकार द्यावा”, असं मत व्यक्त केलं आहे. २८-२९ मे रोजी मुंबईत होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत हा विषय चर्चेला घेतला जाणार असल्याचं समजतंय.

इंग्लंडमधील काउंटी चॅम्पियनशीप स्पर्धेत २०१६ सालापासून नाणेफेकीला रामराम करत पाहुण्या संघाला प्रथम फलंदाजी किंवा गोलंदाजी निवडण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे, इंग्लंडचा माजी खेळाडू अँड्रू स्ट्रॉस, श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने, राहुल द्रविड, टीम मे, पंच रिचर्ड केटलबरो, सामनाधिकारी रंजन मगदुले, शॉन पोलॉक यांची समिती नाणेफेकीच्या या जटील प्रश्नावर निर्णय घेणार असल्याचं समजतंय.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत