काँग्रेसच्या काळात दररोज बॉम्बस्फोट व्हायचे: मोदींचा हल्लाबोल

१० वर्षांपूर्वी मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यावरुन कोणी टीका केली की त्याला गप्प केले जायचे, अशा शब्दात त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

रायगड माझा वृत्त 
२६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यास १० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात भारताच्या कानाकोपऱ्यात दररोज बॉम्बस्फोट व्हायचे. १० वर्षांपूर्वी मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यावरुन कोणी टीका केली की त्याला गप्प केले जायचे, पण आम्ही दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर दिले आहे. आता जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना बाहेर पडणेही कठीण झाले, असा दावा करत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राजस्थानमधील भिलवाडा येथे प्रचारसभा घेतली. या प्रचार सभेत त्यांनी काँग्रेसचा समाचार घेतला. भिलवाडावर अनेक संकटं आली, पण त्यांनी कधीही महाराणा प्रताप यांची साथ सोडली नाही. एसी खोलीत बसून भाजपाचा पराभव होतोय, असे गीत गाणाऱ्या राज दरबारी आणि राग दरबारी यांनी सभेसाठी जमलेली गर्दी पाहावी, असे मोदींनी सांगितले. ‘आज २६ नोव्हेंबर आहे. त्यावेळी रिमोट कंट्रोल दिल्लीतून चालायचा. महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता होती. २६/११ ला मुंबईत दहशतवाद्यांनी हल्ला करुन निष्पाप लोकांची आणि जवानांची हत्या केली. या घटनेला १० वर्षे पूर्ण झाली’, असे त्यांनी सांगितले. या हल्ल्याने जग हादरले होते आणि काँग्रेस त्यामध्येही निवडणुकीचा खेळ खेळत होती. काँग्रेस त्यावेळी देशभक्तीवर व्याख्यान देत होती आणि तोच पक्ष सर्जिकल स्ट्राइकवर प्रश्न उपस्थित करत आहे, असे मोदी यांनी नमूद केले.

काँग्रेस नेते सांगतात सर्जिकल स्ट्राइकचा व्हिडिओ दाखवा. देशातील जवान हातात कॅमेरा घेऊन सर्जिकल स्ट्राइकला जाणार का, असा सवालही मोदींनी विचारला. दहशतवादाविरोधात आम्ही असा लढा दिला की काश्मीरमध्ये आता दहशतवाद्यांना घराबाहेर पडणेही कठीण होत आहे. त्यांना थेट मृत्यूच दिसू लागलाय, असे मोदींनी सांगितले. भारत २६/११ चा हल्ला कधीच विसरणार नाही आणि त्याच्या गुन्हेगारांनाही कधीच विसरणार नाही. कायदा आपलं काम करत राहील असे आश्वासन मी देशवासीयांना देतो, असेही त्यांनी नमूद केले. नक्षलवादी हल्ल्यात जवानह शहीद होतात, निष्पाप नागरिकांचा मृत्यू होतो आणि अशा नक्षलवाद्यांचा काँग्रेस नेते ‘क्रांतिकारी’ असा उल्लेख करतात. लोकशाहीत दहशतवाद आणि नक्षलवादाला स्थान नाही. आम्ही दोघांनाही त्यांच्याच भाषेत उत्तर दिले आहे, असा दावाही त्यांनी केला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत