काँग्रेसच्या बॅनरवर नेत्यांच्या जातीचा उल्लेख, राहुल गांधींनी माफी मागण्याची भाजपाची मागणी

रायगड माझा वृत्त 

काँग्रेसच्या बॅनरवर अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासहित इतर नेत्यांच्या फोटोसोबत त्यांच्या जातीचा उल्लेख करण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. बिहारमध्ये हे बॅनर लावण्यात आले आहेत. भाजपाने बॅनरवर आक्षेप घेत राहुल गांधींवर टीका केली आहे. राहुल गांधी बिहारमध्ये जातीचं राजकारण करत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. बिहारची राजधानी पाटणामध्ये अनेक ठिकाणी हे बॅनर लावण्यात आले आहेत.

बॅनरमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि बिहारमधील अखिल भारतीय काँग्रेस कमिटी इन-चार्ज शक्तिसिंह गोहिल यांचे आभार मानण्यात आले आहेत. नव्या काँग्रेस समितीची नियुक्ती केल्याने त्यांचे आभार मानत, सामाजिक सौदार्हाचं उदाहरण ठेवल्याबद्दल हे आभार मानण्यात आले आहेत.

बॅनरवर राहुल गांधींसहित इतर नेत्यांच्या जातीचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. राहुल गांधी आणि बिहार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मदन मोहन झा यांना ब्राम्हण समाजाचे प्रतिनिधित्व करत असल्याचं दाखवण्यात आलं असून, शक्तिसिह गोहिल राजपूत समाजाचं नेतृत्व करत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. बॅनरवरुन झालेल्या वादानंतर काँग्रेस नेत्यांनी कोणतंही भाष्य करणं टाळलं असून भाजपाला टीका करण्याची संधी मिळाली आहे. भाजपा प्रवक्ते निखील आनंद यांनी निवडणूक आयोगाला बॅनरची दखल घेण्यास सांगितलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस जातीचं राजकारण करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत