काँग्रेसने केलाय फडणवीसांवर जमीन घोटाळ्याचा आरोप; प्रसाद लाड ठोकणार अब्रुनुकसानीचा दावा 

मुंबई : रायगड माझा वृत्त 

नवी मुंबईत सिडकोच्या २४ एकर जागेबाबत मोठा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसने केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहमतीने हा हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यामध्ये मंत्रालयातील अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा हात असून त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सिडकोच्या ताब्यातील या जागेची किंमत बाजारभावाप्रमाणे १६०० कोटी रुपये इतकी आहे. मात्र, ती केवळ ३ कोटी रुपयांत बिल्डर मनिष भतिजा आणि संजय भालेराव यांना विकण्यात आल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. यातील बिल्डर भालेराव हे प्रसाद लाड यांचे खास दोस्त आहेत. प्रसाद लाड हे मुख्यमंत्र्यांचे व्यवसायिक सहकारी आहेत. त्यामुळे लाड यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांच्या संमतीने हा व्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी दिलेल्या संबंधीत आठ शेतकऱ्यांच्या नावे  ही जागा आहे. सिडकोच्या ताब्यातील या जागेचा व्यवहार पनवेल तहसिल कार्यालयाने केला आहे. यावर सिडकोने कुठलाही आक्षेप घेतला नाही. उलट सिडकोने मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र लिहून ही जागा डिनोटिफाईड करीत असल्याचे सांगितल्याचे निरुपम यांनी सांगितले.

हा व्यवहार ३७१ रुपये प्रति चौरस मीटर दराने झाला आणि सध्या या भागातला दर प्रति चौरस मीटर १.८४ लाख रुपये इतका आहे. या व्यवहारामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केलेले नाही तर सगळ्यांचीच धूळफेक केली गेलेली आहे. बागेसाठी राखीव असलेला भूखंड मुख्यमंत्र्यांच्या सहकाऱ्याच्या व त्यांच्याशी संबंधित बिल्डरांच्या घशात घातला व तब्बल १६०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या व्यवहरातील उर्वरीत रक्कम भाजपाला निधी म्हणून देण्यासाठीच केल्याचा गंभीर आरोपही निरुपम यांनी केला आहे.

यामध्ये सगळे कायदे धाब्यावर बसवत नावांमध्ये बदल करणे, पॉवर ऑफ अॅटर्नी देणं, सर्वे या सगळ्या गोष्टी एका दिवसांत म्हणजेच अवघ्या २४ तासांमध्ये उरकण्यात आल्या. सिडको अथवा कुठल्याही सरकारी यंत्रणेने विरोध तर केलाच नाही उलट बेकायदेशीर कृत्य करण्यात सहाय्य केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, रणजीत सुरजेवाला व संजय निरुपम यांनी केला आहे.

हा मोठा भ्रष्टाचार असून या प्रकरणाची खुली चौकशी व्हावी तसेच हा व्यवहार रद्द करण्यात यावा अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

आरोप बिनबुडाचे : आमदार प्रसाद लाड 

भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी काँग्रेसने माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत. त्यामुळे मी काँग्रेस विरोधात ५०० कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकतो आहे असे प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढले हा कोणताही घोटाळा केल्याचा पुरावा असू शकत नाही. माझी अनेक नेत्यांशी आणि बिल्डर्ससोबत मैत्री आहे असेही लाड यांनी म्हटले आहे. तसेच काँग्रेसच्या आरोपांमध्ये काहीही अर्थ नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत