काँग्रेसमुळे राममंदिर रखडले – मोदी

अलवर : रायगड माझा वृत्त 

राममंदिर उभारणीच्या मुद्दय़ावर देशभरात वातावरण तापलेले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच या मुद्दय़ावरून आपले मौन सोडले आहे. राममंदिर काँग्रेसमुळेच होऊ शकले नाही. अयोध्येत राममंदिर व्हावे अशी काँग्रेसची इच्छा नाही असे मोदींनी म्हटले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राममंदिर उभारणीसाठी दोन दिवसांचा झंझावाती अयोध्या दौरा केला. त्यामुळे देशभरात राममंदिराचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. ‘अब हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर, फिर सरकार’ असा नारा देत उद्धव ठाकरे यांनी राममंदिरासाठी केंद्र सरकारने अध्यादेश आणावा, कायदा करावा असेही बजावले आहे. राममंदिराच्या मुद्दय़ावरून असे वातावरण तापलेले असताना पंतप्रधान मोदींनाही अखेर मौन सोडावे लागले आहे. मात्र राममंदिर उभारणीच्या विलंबाला त्यांनी काँग्रेसला जबाबदार धरले आहे.

न्यायाधीशांना महाभियोगाची धमकी
राजस्थानच्या अलवार येथील जाहीर सभेत बोलताना मोदी म्हणाले, 2019 पर्यंत राममंदिराचा निकाल यावा असे काँग्रेसला वाटत नाही. काँग्रेसच्या नेत्यांनीच सर्वोच्च न्यायालयात राममंदिर प्रकरणाची सुनावणी टाळण्यास सांगितले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जेव्हा सर्वांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा काँग्रेसचे खासदार आणि वकील न्यायमूर्तींविरोधात महाभियोग दाखल करण्याची धमकी देत होते, असा गंभीर आरोपही मोदींनी केला. त्यांचा रोख अर्थातच कपिल सिब्बल यांच्याकडे होता. राममंदिराच्या विलंबास काँग्रेसला जबाबदार ठरवणाऱया पंतप्रधानांनी मंदिर निर्माणासाठी अध्यादेश आणणार का यावर मात्र कोणतेच भाष्य केले नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत