‘काँग्रेसला आघाडी करा म्हणून सांगून थकलो’-केजरीवाल

नवी दिल्‍ली : रायगड माझा वृत्त

आगामी लोकसभेच्‍या निवडणुकीसाठी राजकीय मंडळीनी कंबर कसली आहे. प्रचार सभा, दौरे यावर सर्वच भर देत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपचा रथ कसा रोखायचा तसेच समविचारी पक्षांच्या मतांमध्ये विभागणी होऊ नये यासाठी  काय करायचे याची चिंता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सतावत आहे. ही चिंता त्‍यांनी एका सभेत बोलून दाखवली. वारंवार आघाडीसाठी विचारुनही काँग्रेस प्रतिसाद देत नसल्याने अरविंद केजरीवाल हतबल झाले आहेत. दिल्लीतील चांदणी चौक येथे बुधवारी (ता.२० ) झालेल्या एका सभेत त्‍यांनी त्‍यांच्‍या मनाची घालमेल सर्वांच्‍यासमोर व्‍यक्‍त केली.

अरविंद केजरीवाल यांच्‍या प्रश्‍नावर काँगसेच्‍या दिल्‍लीच्‍या माजी मुख्‍यमंत्री शीला दीक्षित यांनी पलटवार केला आहे. त्‍या म्‍हणाल्‍या की, आघाडीबाबत अरविंद केजरीवाल यांच्‍याशी काँगसेचे एकदाही बोलणे किंवा चर्चा झालेली नाही मग ते कोणत्‍या मुद्दयाच्‍या आधारे असे बोलतात.

या सभेवेळी अरविंद केजरीवाल म्‍हणाले की, ”जर आज काँग्रेससोबत आमची आघाडी झाली तर भाजपा दिल्लीतील सर्व जागा हारेल. त्यामुळे काँग्रेसला आघाडीसाठी तयार करण्याचा प्रयत्न  करत आहे. मात्र, काँग्रेसने आघाडीसाठी नकार दिला आहे. त्‍यामुळे काँग्रेसला सारखे- सारखे विचारुन मी आता थकलो  आहे. मला कळतच नाही की,  त्यांच्या मनात नेमके काय सुरु आहे.”

तसेच अरविंद केजरीवाल पुढे म्‍हणाले की, काँग्रेसने उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीमध्ये फूट पाडण्‍याचे काम केले. तसेच काँग्रेस दुसऱ्या पक्षांना कमजोर करीत असल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी केला. त्यामुळे दिल्लीच्या सर्व जागांवर आम आदमी पार्टी एकट्यानेच निवडणूक लढवणार असल्याची त्‍यांनी जाहीर केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत