काँग्रेससोबत आघाडीसाठी चर्चेची दारे अजूनही खुली!

नांदेड : रायगड माझा वृत्त

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती व्हावी यासाठी माझी खासदार अशोक चव्हाण यांच्याशी अनेकदा चर्चा झाली आहे. या चर्चेत फारसे काही निष्पन्न झाले नसले तरी काँग्रेसशी याबाबत चर्चा करण्यास आमची दारे अजूनही उघडी आहेत. आम्ही काँग्रेसबाबत अजूनही सकारात्मक विचार करत आहोत, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज नांदेड येथे सांगितले.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नवमोंढा मैदानावर आज सत्ता संपादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअगोदर बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. या पत्रकार परिषदेस एमआयएमचे आमदार इम्तियाज अली, वंचित बहुजन आघाडीचे नांदेड लोकसभेचे उमेदवार प्रा. यशपाल भिंगे, गफार कादरी हेही उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, काँग्रेसच्या नेत्यांचा आम्हाला नेहमी प्रश्न असतो, तुम्ही एमआयएम सोबत का जाता? त्यांना मी नगर आणि उदगीरचे उदाहरण देऊन सांगतो की, तुम्ही या दोन्ही जागी भाजपशी साटेलोटे करून भारतीय जनता पक्षाला सत्तेवर आणले, तुम्ही भाजपबरोबर जातात म्हणून आम्ही एमआयएम सोबत जातो.

वंचित बहुजन आघाडी अधिक व्यापक करण्यासाठी सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टी आणि इतर धर्मनिरपेक्ष विचारांच्या पक्षांशी आमची बोलणी चालू आहे, असेही त्यांनी सांगितले. गेल्या 70 वर्षात ज्या भटक्या-विमुक्त जमातीस कोणत्याच पक्षाने प्रतिनिधीत्व दिले नाही, त्या भटक्या विमुक्त जमातीस वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रतिनिधीत्व देण्याचा आमचा निर्धार आहे, असेही त्यांनी सांगितले.

सध्याचे भाजप सरकार रोबोच्या गोष्टी करीत आहे, पण ज्या देशात बेरोजगारांची संख्या जास्त आहे त्या देशात रोबोची चर्चा ही व्यर्थ आहे. आम्ही रोजगार निर्मिती करणारे तंत्रज्ञान अवलंबणार आहोत.

वंचित बहुजन आघाडी निवडणुकीत उतरल्यामुळे कोणाची मते विभागली जाणार आहेत या प्रश्नाला उत्तर देताना बाळासाहेब म्हणाले की, आमच्या सोबत मुस्लिम आल्यामुळे काँग्रेसची मते आणि बहुजन समाजही आमच्यासोबत आल्यामुळे भाजपची मते विभागली जाणार आहेत. आम्ही जेवढे उमेदवार उभे करू, तेवढे सर्व जिंकून दाखवू, असेही ते म्हणाले.

भाजपला देशाचे संविधान बदलायचे आहे, तो पक्ष संविधान मानत नाही, धर्माचे स्वातंत्र्य या पक्षास मान्य नाही, हा पक्ष लोकशाहीही मानत नाही म्हणून आम्ही त्याच्याविरुद्ध लढत आहोत. डावे पक्ष आणि जनता दल यांच्याशी बोलणी चालू आहे. परंतु त्यांनी अजून त्यांचा निर्णय सांगितलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत