‘काँग्रेस-जेडीएस युती तुटणार; लवकरच भाजपचे सरकार’

बंगळूर : रायगड माझा 

युती सरकार पाच वर्षे चालणार नाही. अथसंकल्पावरून त्या दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू आहे. त्यांच्यातीलच काही नेते आता सरकारच्या भवितव्याबाबत नकारात्मक विधाने करत आहेत. त्यांच्या चुकांमुळेच त्यांना सरकार गमविण्याची वेळ येणार असल्याचे भाकीत येडियुराप्पांनी केले. कर्नाटकात सर्वाधिक आमदार निवडून आले तरी सत्ता न मिळाल्याची खंत न बाळगता पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीत 28 पैकी 25 जागांवर भाजप खासदार निवडून आणण्याचा, राजकीय खेळी सोडून योग्य प्रशासन द्यावे अन्यथा त्याविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा युती सरकारला देण्याचा आणि केंद्रातील भाजप सरकारने चार वर्षांत यशस्वीपणे विविध योजना राबविल्याने अभिनंदनाचा असे विविध ठराव राज्य भाजप कार्यकारिणी बैठकीत करण्यात आले.

विधानसभा निवडणुकीत प्रदेश काँग्रेसच्या आमदारांची संख्या 123 वरून 80 आली. गत सरकारमध्ये मंत्रीपदी असणार्‍या 17 जणांना हार पत्करावी लागली. भाजपने 104 जागा मिळविल्या तरी सर्वोच्च न्यायालयाने चोवीस तासांत बहुमत सिद्ध करण्याची मुदत दिल्याने अपयश आले. यामागे आपण केलेल्या चुकाच कारणीभूत असल्याची खंत प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्या यांनी व्यक्‍त केली.

येथील अरमने मैदानावर आयोजित भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते. 17 मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ आपण घेतली होती. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली होती. मात्र, काँग्रेस आणि निजद नेत्यांनी याबाबत आक्षेप घेऊन सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर मध्यरात्री सुनावणी करून केवळ चोवीस तासांत बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली. इतर पक्षातील अनेक आमदार भाजपप्रवेशासाठी इच्छुक होते. मात्र, वेळ कमी मिळाल्याने काहीच करणे शक्य नव्हते.

भाजपमध्ये येण्यास कुणी इच्छुक असेल तर त्या नेत्यांचे स्वागतच होईल. भाजपमधील नेत्यांनी आपले महत्त्व कमी होईल, अशी भीती कोणत्याही कारणास्तव बाळगू नये. पक्षातील नेत्यांवर अन्याय होणार नसल्याचे आश्‍वासन येडियुराप्पांनी दिले.

कर्नाटकात भाजपच मोठा पक्ष
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस मुरलीधर राव म्हणाले, विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा मिळविल्या तरी विरोधी बाकावर बसावे लागले आहे. पण, यामधून महत्त्वाचा निष्कर्ष काढण्यात आला असून दक्षिणेतील एका राज्यात आता भाजप हा मोठा पक्ष आहे. आता पुढील लक्ष्य लोकसभा निवडणूक आहे. लोकसभेत जास्तीतजास्त खासदारांना निवडून आणण्याची जबाबदारी सर्वांवर आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत