कांद्याची आवक वाढली असून, दरात सुमारे ४० टक्‍क्‍यांची घसरण

वाशी : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त 

लांबलेला पाऊस, अवकाळीमुळे गेले काही आठवडे कांद्याच्या दराने उसळी घेतली. नवीन कांद्याचा हंगाम लांबला आणि जुन्या कांद्याचे दर वाढले. वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढली असून, दरात सुमारे ४० टक्‍क्‍यांची घसरण झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात ९० ते १३० रुपये गेलेला कांदा आता ६० ते १०० रुपयांपर्यंत आला आहे; तर किरकोळ बाजारात १६० रुपयांवर पोहोचलेला कांदा प्रतवारीनुसार आता १०० रुपये किलोने मिळत आहे.

वाशीतील एपीएमसीमध्येही कांद्याने शंभरी पार केली होती. घाऊक बाजारात ९० ते १३० रुपयांवर गेलेला कांदा किरकोळ बाजारात १६० रुपयांपर्यंत पोहोचल्याने सामान्य ग्राहक कांदा घेताना हात आखडता घेत होते. छोट्या उपाहारगृहांच्या थाळीतूनही कांदा गायब झाला होता; मात्र आता एपीएमसीमध्ये गुजरातमधूनही कांद्याची आवक वाढली आहे. त्याचप्रमाणे तुर्कस्थान, इजिप्तमधूनही कांदा आयात करण्यात आला आहे. त्यामुळे घाऊक बाजारात कांदा ६० ते १०० रुपयांपर्यंत घसरला असून किरकोळ बाजारातदेखील दरात मोठी घसरण झाली आहे. त्यातच आता नवीन कांद्याची आवकदेखील हळूहळू वाढत असल्याने दरात आणखीनच घट होण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सध्या एपीएमसीमध्ये रोज कांद्याच्या १३० गाड्या दाखल होत असून, त्यातील २० गाड्या गुजरातमधून येतात. बाजारात येणारा ९९ टक्के कांदा नवीन आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत