काकांना पुतण्याची भीती कधीपासून वाटायला लागली?

रामदास कदम यांनी राज ठाकरेंवर निशाणा

मुंबई : रायगड माझा वृत्त

मला राज ठाकरेंना विचारायचंय की, काकांना पुतण्याची भीती कधीपासून वाटायला लागली? असा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी राज ठाकरेंना उद्देशून प्रश्न विचारला आहे. मनसेने प्लास्टिकबंदीच्या निर्णयातील त्रुटींवर आक्षेप घेतले असून, त्यांना उत्तर देताना रामदास कदम यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.

रामदास कदम नेमकं काय म्हणाले?
काल काही पक्षांनी प्लास्टिक बंदीबाबत काही मागण्या केल्या. प्लास्टिकबंदी मान्य, पण पर्याय द्या, दंड जास्त आहे, असे आक्षेप घेतले गेले. पण राज ठाकरेंना मला विचारायचं आहे की, काकांना पुतण्याची भीती कधीपासून वाटायला लागली? आदित्य ठाकरेंनी प्लास्टिकबंदीचा निर्णय घेतल्यानेच फक्त मनसेकडून विरोध होतो आहे.”, असे रामदास कदम म्हणाले.

महाराष्ट्रात 23 जूनपासून प्लास्टिकबंदी लागू झाल्यानंतर,बंदीवर विरोधकांनी काही आक्षेप घेतले. यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वात पुढे आहे. प्लास्टिकबंदी करताना पर्यात दिला नाही, तसेच दंडाची रक्कमही अव्वाच्या सव्वा असल्याचे मनसेचे मत आहे. त्यामुळे मनसेने प्लास्टिकबंदीतील त्रुटींविरोधात आवाज उठवला आहे. याची दखल आता पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी घेतली आहे.

प्लास्टिकबंदीचा निर्णय नोटाबंदीसारखा नाही
“प्लास्टिकबंदीचा निर्णय नोटाबंदीसारखा नसून, सहा महिन्यांआधी घोषणा केली. त्यावर कोर्टाने तीन महिने वाढवून दिले. एसटी, बस स्टॉप, वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या होत्या. हे जर एखाद्या पुढाऱ्याला माहिती नसेल, तर त्यांचं अपयश आहे. स्वतःचं अपयश झाकण्यासाठी उगाच चांगल्या कामात खोडा घालू नये.”, अशी जळजळीत टीकाही रामदास कदमांनी मनसे आणि राज ठाकरे यांचे नाव न घेता केली.
प्लास्टिक उद्योग करणाऱ्यांना आणि बेरोजगार झालेल्यांना मागच्या सहा महिन्यांपासून माहिती होतं प्लास्टिकबंदी होणार आहे. प्लास्टिकबंदी एका दिवसात केलेली नाही, असेही रामदास कदम यांनी नमूद केले.
तसेच, 80 टक्के प्लास्टिक उत्पादन गुजरातमध्ये होत असल्याने हजारो कोटींची गुंतवणूक गुजरातची आहे आणि बेरोजगार ही गुजरातचेच लोकं होत आहेत, असे रामदास कदम म्हणाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत