काकाच्या कारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू

कोल्हापूर :रायगड माझा ऑनलाईन 

कार पार्किंगमध्ये लावत असताना चाकाखाली सापडून भक्‍ती दीपक वडणकर (वय 2) या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास मार्केट यार्डनजीक लोणार वसाहतीत ही घटना घडली. राहत्या घराजवळ चुलते दिनेश वडणकर हे कार पार्किंग करीत असताना हा प्रकार घडला. भक्‍ती सकाळी घरासमोर खेळत होती. तिचे चुलते दिनेश कार घेऊन घराजवळ आले.

त्यांना पाहून भक्‍ती कारच्या दिशेने गेली. ती समोरील चाकाजवळ थांबली असल्याचे दिनेश यांना दिसले नाही. कार पार्किंगमध्ये घेत असताना ती पुढील चाकाखाली आली. डोक्यावरून चाक गेल्याने ती गंभीर जखमी झाली. शेजार्‍यांनी हा प्रकार पाहून आरडाओरडा केला. दिनेश यांनी कार तत्काळ बाजूला घेतली. गंभीर अवस्थेतील भक्‍तीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. भक्‍तीच्या चटका लावणार्‍या मृत्यूने परिसरातील नागरिक हळहळले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत