काकासाहेब शिंदे जलसमाधीचे माणगांवमध्ये तीव्र पडसाद, माणगावात बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद

माणगांव : प्रवीण गोरेगांवकर

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 28 वर्षीय तरुणाने घेतलेल्या जलसमाधीचे माणगांवात जोरदार पडसाद उमटले. माणगांव तालुक्यातील मराठा समाजाने सकाळी 8.00 वाजताच माणगांवमध्ये जमत मराठा समाज कृति समितीच्या कार्यकर्त्यांनी माणगांव बाजारपेठेत जोरदार घोषणाबाजी करीत माणगांव बंदची हाक दिली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून माणगांव पोलिस निरिक्षक विक्रम जगताप यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

 

मंगळवार दि. 24 जुलै रोजी सकाळी 8.30 वाजता माणगांव बसस्थानकासमोर सर्व सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते जमले होते. तेथून त्यांनी निजामपूर रोड, मोर्बा रोड, कचेरी रोड, मुख्य बाजारपेठ येथे फिरत माणगांव बंदची हाक संपुर्ण बाजारपेठेत दिली. व्यापाऱ्यांनीही या बंदच्या हाकेला प्रतिसाद देत आपापली दुकाने बंद ठेवली. सरकारी कार्यालये व  अत्यावश्यक सेवा वगळता हा बंद 100 टक्के यशस्वी झाल्याचा दावा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला. गंगापूर येथील कार्यकर्ते काकासाहेब शिंदे यांनी कायगाव येथील मराठा आरक्षण जलसमाधी आंदोलनावेळी गोदावरी नदीत उडी मारून जलसमाधी घेतली. त्यांना या शोकसभेत श्रध्दांजली वाहण्यात आली. मराठा क्रांती समाजाच्या संयमाचा बांध फुटला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अकार्यक्षम आहेत त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. काकासाहेब शिंदेच्या कुटूंबियाना 50 लाखाची मदत द्यावी अशीही मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

 

या मोर्चात व्यापारी संघटना असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मण दळवी, सकल मराठा समाजाचे प्रमोद देशमुख, डि.एम. जाधव, आप्पा महामुणकर, गजानन अधिकारी, राजू मोरे, बी. एन. बिरादार, संजय घाग, रामजी कदम,  महेंद्र दळवी, बावस्कर यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत