काय म्हणाले भास्कर जाधव तटकरेंवर ?

‘मी तटकरेंच्या घराण्यातील उमेदवाराच्या शोधात’

रायगड माझा वृत्त |

विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या जागेसाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांच्या घराण्यातून कोणाला उमेदवारी देता येईल, याचा शोध घेण्यात आपण सध्या अतिशय व्यग्र असल्याचा उपरोधिक टोला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांनी लगावला आहे. कोकणात राष्ट्रवादीकडे तटकरे कुटुंबाशिवाय काही पर्यायच नाही का, असे विचारले असता, नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत अनिकेत तटकरे विजयी होण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी चांगले सहकार्य केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांच्याच कुटुंबातील कोणा तरी व्यक्तीला पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी दिल्यास पक्षाला निश्चितपणे यश मिळेल असे मला वाटते, अशीही खोचक टिप्पणी जाधव यांनी केली.

नुकतेच जामिनावर सुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची शिवसेनेशी जवळीक वाढली असून त्यांच्याप्रमाणेच एके काळी सेना सोडून गेलेल्या नेत्यांच्या ‘घरवापसी’साठी भुजबळ यांनी पुढाकार घेतला असल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या यादीत जाधव यांचेही नाव असल्याने संपर्क साधला असता तशी शक्यता त्यांनी फेटाळून लावली. त्यावर, सध्या पक्षामध्ये आपल्यावर नेमकी काय जबाबदारी आहे, असे विचारले असता, अत्यंत उपरोधिक सुरात ते म्हणाले की, सध्या मी रिकामा असल्याची कोणाची समजूत असेल तर ती अत्यंत चुकीची आहे. विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागली आहे.

मागील वेळी या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडून गेलेले निरंजन डावखरे या वेळी भाजपकडून ही निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे नवीन उमेदवार शोधण्याची गरज आहे. म्हणून या मतदारसंघातून पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सरचिटणीस तटकरे यांच्या घराण्यातून कोणाला उमेदवारी देता येईल, याचा शोध घेण्यात सध्या मी अत्यंत व्यग्र आहे. कारण रायगड जिल्हा परिषद असो किंवा कोकणातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ असो, तटकरे यांच्या घराण्याकडेच या जागा देण्यात आल्या आहेत. विधान परिषदेवर तर आधी दोन वेळा त्यांचे बंधू आणि आता चिरंजीवांची वर्णी लागली आहे. त्यामुळे या विभागातील कोणतीही निवडणूक असो, तटकरे यांच्या घराण्यातील व्यक्तीशिवाय दुसरे कोणी पात्र असूच शकत नाही, हे लक्षात घेता, आता पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तटकरे कुटुंबातून कोणाला उमेदवारी देता येईल, याचा मी शोध घेत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत