काश्मीरमध्ये हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळल्याच्या दुर्घटनेत नाशिकच्या पायलटचा मृत्यू

नाशिक : रायगड माझा वृत्त

जम्मू काश्मीरमधील बडगाम येथे हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळल्याच्या दुर्घटनेत नाशिकमधील पायलट स्कॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे (वय ३२) यांचा मृत्यू झाला आहे. निनाद यांचे कुटुंबिय सध्या लखनऊ येथे असून ते नाशिकला गुरुवारी पोहोचणार असून त्यानंतर निनाद यांच्या पार्थिवावर नाशिकमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत.

निनाद हे औरंगाबादच्या सैनिकी सेवा पूर्व संस्थेच्या (एसपीआय) २६ व्या कोर्सचे माजी विद्यार्थी आहेत. एसपीआय ही जास्तीत जास्त मराठी मुलांची सैन्यधिकारी म्हणून निवड व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेली संस्था आहे. तेथून त्यांची निवड पुणे येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एनडीए) झाली. त्यानंतर ते पायलट म्हणून भारतीय हवाई दलात भरती झाले. गेल्या नऊ वर्षांपासून ते हवाई दलात कार्यरत होते. गुवाहाटीनंतर श्रीनगर येथे त्यांची बदली झाली होती. जम्मू काश्मीरमधील बडगाम येथे बुधवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास MI 17 V5 या हेलिकॉप्टरमध्ये एकूण सहा जण प्रवास करीत होते. याच विमानाचे सारथ्य निनाद हे करीत होते. मात्र, सकाळी १० वाजून १० मिनिटांनी हे हेलिकॉप्टर बडगाम जवळ कोसळले. या अपघातात निनाद तसेच अन्य तीन अधिकारी व एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तशी माहिती हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी निनाद यांच्या कुटुंबियांना फोनद्वारे दिली आहे. या दुर्घटनेची कोर्ट ऑफ इन्क्वायरी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

निनाद यांचे पार्थिव हवाई दलाच्या विमानाने शुक्रवारी (१ मार्च) नाशिकमध्ये आणले जाईल अशी शक्यता आहे. मांडवगणे कुटुंबीय सध्या लखनऊ येथे आहेत. निनाद यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, दोन वर्षांची मुलगी, भाऊ असा परिवार आहे. गुरुवारी अहमदाबादमार्गे हे कुटुंबीय नाशिकला येणार आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत