काही केबल कंपन्यांकडून पेड चॅनेल बंद

पुणे : रायगड माझा वृत्त

‘टेलिकॉम रेग्युलेटरी ॲथॉरिटी’च्या (ट्राय) नव्या नियमांमुळे केबल कंपन्या, केबल ऑपरेटर आणि ग्राहकांमध्ये सुरू असलेला गोंधळ संपलेला नाही. दरम्यान, विविध केबल कंपन्यांकडून मिळणारी सेवा हळूहळू बंद होऊ लागली आहे. तर चॅनेलचे नवीन पॅकेजचे अर्ज देण्यासाठी केबल ऑपरेटरकडे ग्राहकांची गर्दी वाढत आहे.

ट्रायने नव्या नियमानुसार केबल ग्राहकांना आपल्या पसंतीचे टीव्ही चॅनेल निवडीचे अधिकार दिले आहेत. त्यासाठी ट्रायने दोन वेळा मुदतवाढ दिली होती. ही मुदत संपल्यामुळे ज्या ग्राहकांनी चॅनेल निवड केली नाही त्यांची ‘पेड चॅनेल’ची सेवा बंद झाली आहे. शहरात चार ते पाच मोठ्या केबल कंपन्यांकडून केबल सेवा पुरवली जाते. त्यापैकी काही केबल कंपन्यांमार्फत दिल्या जाणाऱ्या ‘पेड चॅनेल’ची सेवा गेल्या दोन दिवसांपासून बंद झाली आहे. तर काही कंपन्यांची सेवा टप्प्याटप्प्याने बंद होत आहे. ग्राहकांकडून पसंतीचे चॅनेल निवडून अर्ज देण्यासाठी केबल ऑपरेटरांच्या कार्यालयात गर्दी वाढत आहे. मोठ्या संख्येने अर्ज आल्यामुळे केबल कंपन्यांच्या वेब पोर्टलवर ते भरताना केबल अडचणी येत आहेत. त्यामुळे अर्ज भरून दिल्यानंतरदेखील केबल सुरू होण्यास दोन, दोन दिवसांचा कालावधी लागत असल्याने वादावादीचे प्रकार घडत आहेत.

कमिशनवरून वाद  
केबल कंपन्या आणि त्यांचे ऑपरेटर यांच्यात कमिशनवरून वाद सुरू आहे. या संदर्भात पुणे केबल ऑपरेटर असोसिएशनने केबल कंपन्यांना दोन दिवसांची मुदत दिली होती. ती उद्या संपणार आहे. त्यामुळे या वादावर तोडगा निघणार का, याकडे सर्व केबल ऑपरेटर यांचे लक्ष लागून राहिले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत