किनवटचे पाच नगरसेवक अपात्र; जिल्हाधिकारी डोंगरेंची कारवाई

नांदेड : रायगड माझा 

जिल्ह्यातील किनवट नगरपालिकेच्या पाच नगरसेवकांना निवडणूक खर्च मुदतीत दाखल केला नसल्याने जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी तीन वर्षांसाठी अपात्र ठरविले आहे. यात राष्ट्रवादीच्या चार तर भाजपच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. सोबतच इतर उमेदवारांना अपात्र ठरविल्यामुळे खळबळ उडाली आहे.

 

किनवट नगरपालिकेसाठी मागील वर्षी निवडणूक झाली. यात भाजपचे नगराध्यक्षांसह नऊ, राष्ट्रवादीचे सहा, कॉंग्रेसचे दोन; तर एक अपक्ष नगरसेवक निवडून आला होता. दरम्यान, नगरपालिका अधिनियम व राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणुकीनंतर तीस दिवसांच्या आत निवडणूक खर्च सादर करावा लागतो. परंतु किनवट पालिकेत निवडून आलेल्या प्रभाग दोन (अ) च्या भाजप नगरसेवक अनसूया मधुकर आनेलवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रभाग चार (ब) चे नगरसेवक साजिद खान निसार खान, प्रभाग आठ (ब) चे नगरसेवक हाजी खान शहराबानो निसार खान, प्रभाग नऊ (अ) चे नगरसेवक कैलास रामराव भगत व प्रभाग नऊ (ब) चे नगरसेवक नसीम अब्दुल लतिफ या पाच नगरसेवकांसह निवडणुकीत भाग घेतलेल्या उमेदवारांनी मुदतीत खर्च सादर केला नव्हता. या बाबत त्यांना खर्च सादर करण्याची संधी देऊन खुलासा मागितला होता; परंतु समाधानकारक खुलासा सादर झाला नसल्याने जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी गुरुवारी पाच नगरसेवकांना अपात्र ठरवून तीन वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घातली आहे. या सोबतच उमेदवारांनाही निवडणूक लढविण्यासाठी तीन वर्षांसाठी निर्बंध लावले आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.