कुंभमेळ्यात अनेक परदेशी साधू-साध्वी सहभागी

प्रयागराज : रायगड माझा ऑनलाईन 

समुद्रमंथनातून बाहेर पडलेल्या अमृतकलशातील थेंब ज्या चार ठिकाणी सांडले असे मानले जाते त्या प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या ठिकाणी कुंभमेळा भरतो. अर्धकुंभमेळा केवळ प्रयागराज आणि हरिद्वारमध्येच भरतो. आता उत्तर प्रदेशात प्रयागराज या गंगा, यमुना आणि गुप्‍त सरस्वती अशा त्रिवेणी संगमावरील पवित्र नगरीत 15 जानेवारी ते 4 मार्च या काळात अर्ध कुंभमेळा भरणार आहे. त्यासाठी देश-विदेशातील अनेक साधू,साध्वी व भाविकांचे आगमन होत आहे. विशेषतः परदेशी साधू व साध्वींची संख्या लक्षणीय आहे. यापैकी अनेकांनी आपापल्या शिष्यांसह अखाड्यांच्या पेशवाई (मिरवणूक) मध्ये सहभागही घेतला.

महानिर्वाणी अखाड्याच्या पेशवाईत अनेक देशांमधून आलेले साधू सहभागी झाले होते. या विदेशी साधूंना पाहून स्थानिक लोक थक्‍क होत होते. कुंभमेळ्याच्या काळात हे साधू आपापल्या शिबिरांमध्ये ध्यान, पूजा, जप, योग, भजन, कीर्तन व प्रवचन करीत असताना दिसून येतील. ऑस्ट्रियातून आपल्या शिष्यांसह उमा पुरी असे नाव धारण केलेल्या साध्वी आल्या आहेत. महानिर्वाणी अखाड्याच्या पेशवाईत त्या रथावर आरूढ झाल्या होत्या. प्रयागराजमधील कुंभमेळ्यातील आध्यात्मिक शक्‍तीने आपल्याला इतक्या दूरवर खेचून आणले असल्याचे त्यांनी सांगितले. ऑस्ट्रियाच्याच देवी लक्ष्मी यांनी आपण इतका मोठा संतसमागम यापूर्वी पाहिला नसल्याचे सांगितले. त्या जगभरात आपले गुरू परमहंस स्वामी महेश्‍वरानंद यांच्या उपदेशांचा प्रसार करतात. स्लोव्हाकियाच्या देवी दासी, क्रोएशियाचे बाबा ज्ञानेश्‍वर पुरी महाराज यांच्यासारखे अनेक पाश्‍चात्य साधू-साध्वी प्रयागराजच्या पवित्र स्थळासमोर नतमस्तक होत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत