केंद्र सरकारमधील डॉक्टरांचे निवृत्तीचे वय ६५ वर्ष

मोदी सरकारने केंद्रीय डॉक्टरांना दिवाळीपूर्वीच खूशखबर दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी केंद्रीय आरोग्य सेवेशिवाय इतर डॉक्टरांच्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६२ वरून ६५ वर्षे इतकी केली आहे. या प्रस्तावास बुधवारी मान्यता देण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूर्व प्रभावाने भारतीय रेल चिकित्सा सेवेचे चिकित्सक, उच्च शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या केंद्रीय विद्यापीठ आणि आयआयटीमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टरांच्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढवून ६५ वर्षे करण्याच्या प्रस्तावास अनुमती देण्यात आली.

केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी कॅबिनेटच्या बैठकीनंतर या निर्णयाचा माहिती दिली. आयुष, रेल्वेमध्ये काम करत असलेल्या डॉक्टरांची सेवानिवृत्ती वयोमर्यादा वाढवण्यात आली आहे. यापूर्वी केंद्रीय आरोग्य सेवाच्या चिकित्सकांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६५ वर्षे करण्यात आली होती.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयुष मंत्रालय, संरक्षण विभाग, संरक्षण उत्पादन विभाग, आरोग्य आणि परिवार कल्याण विभागाअधीन दंत चिकित्सक, रेल्वे मंत्रालयतंर्गत दंत चिकित्सक आणि उच्चतम शिक्षण विभागातंर्गत उच्च शिक्षण आणि तांत्रिक संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या प्रशासनिक नियंत्रणाधीन चिकित्कांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढवून ६५ वर्षे करण्यात आली. या निर्णयाचे केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी स्वागत करत हा अत्यंत दूरदृष्टीचा निर्णय असल्याचे म्हटले. यामुळे देशातील आरोग्य सेवा आणखी मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या निर्णयामुळे अनुभवी डॉक्टरांची सेवा मिळेल आणि याचा जनतेला फायदा होईल, असे रवीशंकर यांनी म्हटले. या निर्णयामुळे १४४५ डॉक्टरांना फायदा होईल. यामुळे जास्त आर्थिक बोजाही पडणार नाही. कारण बहुतांश पदे ही रिकामी आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.