केरळमध्ये आंदोलकांचा पोलिस ठाण्यांवर पेट्रोल बॉम्ब हल्‍ला

पथनमथिट्टा (केरळ) : रायगड माझा ऑनलाईन 

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर प्रथमच बुधवारी (दि. २ जानेवारी) शबरीमला मंदिरात दोन महिलांनी प्रवेश करून शेकडो वर्षाची परंपरा खंडित केली. परंतु, या प्रवेशानंतर केरळमध्ये हिंसाचार उसळला आहे. महिलांच्या मंदिर प्रवेशानंतर सनातनी हिंदू संघटनांनी आंदोलन केले आहे. या आंदोलनादरम्‍यान आंदोलकांनी दोन पोलिस ठाण्यांवर आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीआय) कार्यालयावर हल्‍ला केला. याबरोबरच थिरुवनंतपुरम जिल्‍ह्‍यातील पोलिस ठाण्यावर पेट्रोल बॉम्ब टाकण्यात आले.

आंदोलकांना हटविण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुरांचा वापर केला. आंदोलकांनी केलेल्‍या हल्‍ल्‍यात ३१ पोलिस जखमी झाले. केरळ राज्‍य परिवहन मंडळाच्या १०० बसचे नुकसान झाले. दरम्‍यान, महिलांच्या प्रवेशावरुन भाजप आणि काँग्रेसने केरळचे मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांच्यावर मंदिर परंपरा तोडल्याचा आरोप करत टीका केली.

हिंसाचाराच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये सहा भाजप कार्यकर्त्यांवर हल्‍ला करण्यात आला. याबरोबरच दुसऱ्या एका घटनेत सक्तीने भाजप कार्यकर्ते दुकाने बंद करत असताना थ्रिसूरमधील वदनप्पाली येथे सनातनी मुस्लिम पक्ष असलेल्या सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या तीन कार्यकर्त्यांवर हल्‍ला केला.

या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ७४५ जणांना अटक केली आहे, तर ६६८ जणांना हिंसक घटनांच्या प्रतिबंधक कारवाईखाली ताब्यात घेण्यात आले आहे.

या हिंसाचारानंतर मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्‍हणाले की, संघ परिवार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायामल्‍ली करत आहे. शबरीमला येथे केलेल्‍या हिंसाचारातील लोक कोण आहेत हे आम्‍हाला माहित आहे. हिंसाचार करणाऱ्यांवर राज्‍य सरकार कठोर कारवाई करेल. शिवाय मंदिरात प्रवेश करणाऱ्या महिलांना सरकार संरक्षण देईल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत