केरळमध्ये आज ‘ब्लॅक डे’; हिंसाचारात एक ठार

पथनमथिट्टा (केरळ) : रायगड माझा ऑनलाईन 

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर प्रथमच काल (ता.२) शबरीमला मंदिरात दोन महिलांनी पहाटेच्या दरम्यान, प्रवेश करून इतिहास रचला. या घटनेनंतर केरळमध्ये हिंसाचाराने थैमान घातले आहे. काल (ता. २) उफाळलेल्या हिंसाचारामध्ये भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाला होता. त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. चंद्रन उन्नीथन असे त्या कार्यकर्त्याचे नाव आहे. दरम्यान, युनिटेड डेमॉक्रॅटिक फ्रंटकडून आज केरळमध्ये ‘ब्लॅक डे’ घोषित करण्यात आला आहे.

शबरीमला मंदिरातील २०० वर्षाची परंपरा मोडीत काढत दोन महिलांनी गाभाऱ्यात प्रवेश केला. या प्रवेशाला मुख्यमंत्री पी. विजयन यांनी दुजोरा दिल्यानंतर केरळमध्ये सनातनी संघटनांकडून राज्यभरात हैदोस सुरु झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा असलेल्या शबरीमला कृती परिषदेने काल महिलांनी गाभाऱ्यात प्रवेश केल्याच्या निषेधार्थ मोर्चाचे आयोजन केले. या मोर्चावर मार्क्सवादी (सीपीएम) कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याच्या आरोप आहे. या हल्ल्यात चंद्रन गंभीर झाले.

सर्वोच्च न्यायालयाने गेल्यावर्षी २८ सप्टेबर रोजी शबरीमला मंदिरात सर्वच वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याचा आदेश दिला होता. या निर्णयाच्या अंमलबजावणी करण्यास केरळमधील सनातनी संघटनांकडून कडाडून विरोध सुरू आहे. दरम्यान, आजच्या केरळ बंदच्या निर्णयाला भाजपने पाठिंबा दिला आहे. काँग्रेसनेही या काळ्या दिवसाला पाठिंबा दिला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत