कर्नाटक : रायगड माझा वृत्त
कर्नाटक निवडणुकीचा कल आता स्पष्ट झाला आहे आणि काँग्रेसच्या हातातून आणखी एक राज्य गेले आहे, यावर जवळपास शिक्कामोर्तबही झाले आहे. औपचारिकरित्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर लढविलेली ही पहिलीच मोठी निवडणूक होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या गुजरातसह अन्य दोन राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी होत्या, तर निकालापूर्वी ही सूत्रे राहुल यांच्याकडे सोपविण्यात आली होती.
पंजाबचा अपवाद वगळला, तर गेल्या चार वर्षांमध्ये काँग्रेसला एकामागून एक राज्ये गमवावी लागली. कर्नाटक हे काँग्रेसकडे असलेले शेवटचे मोठे राज्य होते. हे राज्यही गमावण्याची वेळ आता पक्षावर आली आहे. या पराभवामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठीचा काँग्रेसचा, विशेषत: राहुल यांचा मार्ग खडतर झाल्याचे मानले जात आहे. 24 वर्षांपूर्वी काँग्रेस देशातील 19 राज्यांमध्ये सत्तेत होती. आता केवळ तीन राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात काँग्रेसची सत्ता आहे. काँग्रेसकडे आता फक्त पंजाब, मेघलय, मिझोरम आणि पॉंडिचेरी हीच राज्ये आहेत.
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा या जोडगोळीसमोर तगडे आव्हान उभे करण्यासाठी विरोधी पक्षांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर एकत्र येण्याची चर्चा सुरू केली आहे. पण या विरोधकांच्या फळीचे नेतृत्त्व काँग्रेसकडेच, पर्यायाने राहुल यांच्याकडेच असावे या प्रयत्नाला कर्नाटक निवडणुकीतील निकालामुळे सुरुंग लागला आहे. यामुळे आता पराभवाच्या दणक्यानंतर ‘विरोधकांचा नेता कोण’ या चर्चेला पुन्हा जोमाने सुरू होईल, अशी शक्यता आहे.
दुसरीकडे, या विजयामुळे दक्षिणेमध्ये पुन्हा पाय रोवण्याची संधी भाजपला मिळाली आहे. 2019 लोकसभा निवडणुकीची ‘सेमी फायनल’ जिंकल्यामुळे भाजपचे मनोधैर्य उंचावले आहे. देशातील 29 पैकी 22 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे.