कॉंग्रेसपुढे पेच; हातमिळवणी तृणमूलशी करायची की माकपशी?

पश्‍चिम  बंगाल शाखेत पडले दोन गट

 
कोलकता : रायगड माझा

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपपुढे तगडे आव्हान उभे करण्याच्या उद्देशातून कॉंग्रेसने विरोधकांची मोट बांधण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, कॉंग्रेसपुढे पश्‍चिम बंगालबाबत मोठाच पेच निर्माण झाला आहे. त्या राज्यात तृणमूल कॉंग्रेसशी हातमिळवणी करायची की माकपशी, असा प्रश्‍न पक्षापुढे उभा राहिला आहे.

पश्‍चिम बंगालमधील कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांची उद्या (शुक्रवार) पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीच्या आधीच पक्षाच्या प्रदेश शाखेत आघाडीवरून दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. एक गट तृणमूलशी तर दुसरा गट माकपशी मैत्री करण्याबाबत आग्रही आहे.

संघटनात्मक मुद्‌द्‌यांवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली गेली आहे. असे असले तरी आघाडी कुणाशी करावी हाच मुद्दा बैठकीतील चर्चेच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. पश्‍चिम बंगालमधील नेत्यांची दोन दिशांना तोंडे पाहता हातमिळवणीचा पेच सोडवण्याचे मोठेच आव्हान कॉंग्रेस श्रेष्ठींपुढे उभे राहण्याची चिन्हे आहेत.

प्रदेश कॉंग्रेसच्या वतीने एक अहवाल तयार करून तो प्रदेश सरचिटणीस ओमप्रकाश मिश्रा यांनी श्रेष्ठींकडे पाठवला आहे. त्यात माकपशी आघाडी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष अधिररंजन चौधरी आणि इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून हा अहवाल बनला आहे. त्या नेत्यांच्या मते तृणमूलशी हातमिळवणी कॉंग्रेससाठी राजकीय आत्महत्याच ठरेल.

मात्र, कॉंग्रेसच्या बऱ्याच खासदार आणि आमदारांना लोकसभेच्या अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी तृणमूलची साथ मोलाची ठरेल, असे वाटत आहे. आता पश्‍चिम बंगालबाबत कॉंग्रेस काय निर्णय घेणार हे पुढील काळात कळेलच.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत