कॉंग्रेस ची माघार भाजपच्या पराभवासाठी

नवी दिल्ली:रायगड माझा

उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसंदर्भात काँग्रेसने एक मोठा निर्णय घेतला आहे. या महिन्यांच्या शेवटी होणाऱ्या कैराना लोकसभा आणि नुरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस स्वत:चा उमेदवार उभा करणार नाही. देशातील भाजपविरोधातील महाआघाडीवर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून काँग्रेसने हा निर्णय घेतल्याचे समजते.

देशात भाजपविरोधातील आघाडीसाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी काँग्रेसने पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. या निर्णयामुळे महाआघाडीसाठी सकारात्मक वातावरण निर्मिती होऊ शकते असे काँग्रेसचे म्हणणे आहे.

उत्तर प्रदेशमध्ये या आधी झालेल्या गोरखपूर आणि फूलपुर लोकसभा पोटनिवडणुकीत समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षाने आघाडी केली होती. त्यामुळेच दोन दशकांपासून योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या गोरखपूरमध्ये भाजपचा पराभव झाला होता. तर उपमुख्यमंत्री असलेल्या केशव प्रसाद मौर्य यांच्या फूलपूरमध्ये देखील सपा-बसपा आघाडीला यश मिळाले होते. हे दोन्ही विजय अप्रत्यक्षपणे देशातील विरोधकांसाठी सकारात्मक संदेश देणारे होते. जर विरोधकांनी त्यांची खेळी योग्य प्रकारे खेळली तर 2019मध्ये भाजपचा पराभव होऊ शकतो हेच या निकालातून समोर आले होते.

काही दिवसांपूर्वीच बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी एका मुलाखतीत 2019मध्ये अखिलेश यावद यांच्यासोबत आघाडी करणार असल्याचे सांगितले होते. ही आघाडी नेमकी कशी असेल आणि जागावाटप कसे केले जाईल याची चर्चा सुरु असल्याचे मायावती यांनी स्पष्ट केले होते.

भाजपचे खासदार हुकूम सिंह यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कैराना येथे तर आमदार लोकेंद्र चौहान यांच्या निधनामुळे नूरपुर येथे पोटनिवडणूक होत आहे. अजित सिंह यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकदलाने तबस्सुम बेगम यांना कैराना येथून उमेदवारी दिली आहे. तर तर भाजपने हुकूम सिंह यांची मुलगी मृगांका सिंह हिला उमेदवारी दिली आहे. नूरपुर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सपाने नैमूल हसन यांना तर भाजपने लोकेंद्र चौहान यांची पत्नी अवनी सिंह यांना उमेदवारी दिली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.