कोकणातील पहिले शहिद जवान स्मारक पूर्णत्वास

देवरुख : रायगड माझा वृत्त 

देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद जवानांचा इतिहास त्यांचे शौर्य सर्वांना माहीत व्हावे, विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची जाणीव जागृत व्हावी या हेतूने देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाने कोकणातील पहिले शहीद जवान स्मृती स्मारक उभारले आहे. या स्मारकाचे काम पूर्णत्वास गेले आहे. 30 मे रोजी या स्मारकाचा लोकार्पण सोहळा दिमाखात होणार आहे. या निमित्ताने शिवछत्रपतींच्या रायगड येथून ज्योत आणली जाणार आहे.

सुमारे पस्तीस लाख खर्चून हे शहीद जवान स्मृती स्मारक उभारण्यात आले आहे. संस्था उपाध्यक्ष मदन मोडक यांनी ही संकल्पना मांडली व मंजिरी मोडक, मदन मोडक यांनी या प्रकल्पासाठी 15 लाखाची देणगीही दिली. संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांनी या संकल्पनेला मूर्त स्वरुप देण्यासाठी देवरूख शिक्षण प्रसारक मंडळासह पाठिंबा दिला.

शहीद जवान स्मृती स्मारकासाठी संरक्षण मंत्रालयाकडून बजरंग रणगाडा व एक तोफ मिळाली आहे. या स्मारकात मध्यभागी मनोर्‍यात प्रेरणादायी स्तंभ उभारण्यात आला असून युद्धात अतुलनीय पराक्रम केलेल्या व परमवीर चक्रप्राप्त जवानांचा इतिहास पॅनेल स्वरुपात मांडण्यात आला आहे. रायगडहून ज्योत आणल्यानंतर शहरातून मिरवणुक काढली जाणार आहे.

परवीरचक्रप्राप्त तिघांना निमंत्रण

लोकार्पण सोहळ्याप्रसंगी परमवीर चक्रप्राप्त बाना सिंग, संजय कुमार व योगेंद्रसिंग यादव यांना निमंत्रित करण्याचा मानस सदानंद भागवत, मदन मोडक यांनी व्यक्त केला आहे. हे तीन वीर उपस्थित राहिल्यास शहरवासियांतर्फे या तीन वीरांची जंगी मिरवणूक काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत