कोकण कृषी विद्यापीठ कुलगुरुपदासाठी चुरस; पाच नावांची शिफारस

दाभोळ : रायगड माझा वृत्त

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या नावाची घोषणा केव्हाही होणार आहे. कुलगुरू शोध समितीने पाच नावांची शिफारस केलेला लखोटा राज्यपालांकडे दिला आहे. त्यानुसार या पाच जणांच्या मुलाखती राज्यपालांनी घेतल्या आहेत. पाचपैकी एकाचे नाव कुलगुरू म्हणून राज्यपाल घोषित करणार आहे.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांनी मुदतीपूर्वीच १ जून २०१८ ला पदाचा राजीनामा राज्यपालांकडे पाठविला होता. राजीनामा राज्यपालांनी स्वीकारल्यावर ३१ जुलैला या विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू के. पी. विश्‍वनाथा यांच्याकडे देण्यात आला होता.

यानंतर राज्यपालांनी कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या निवडीसाठी न्यायमूर्ती मंजुळा चेल्लुर यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू शोध समिती गठित केली होती. या समितीने कुलगुरुपदासाठी अर्ज मागविले होते. त्यानुसार ११ जणांना २३ फेब्रुवारीला समितीने मुलाखतीसाठी बोलावले होते. मुलाखतीसाठी १० जण उपस्थित होते.

त्यापैकी कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. उत्तम महाडकर, राहुरी कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे, मांजरी (पुणे) येथील द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. संजय सावंत व कृषी अनुसंधान परिषदेचे राष्ट्रीय अजैविक स्ट्रेस प्रबंधन संस्थान माळेगाव (बारामती) या संस्थेचे संचालक डॉ. नरेंद्र प्रताप सिंग या पाचजणांची नावे बंद लिफाफ्यातून राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे पाठविली होती. या पाच जणांच्या मुलाखती राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी घेतल्या.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत