कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या विजयासाठी युवासेनाध्यक्ष आदित्य ठाकरे यांचे रायगडात एल्गार !

पाली :विनोद भोईर

      शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे राज्यातील स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न विधान परिषदेतील विजयाने सिद्ध करण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे असे आवाहन युवा सेनेचे अध्यक्ष शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज पाली येथे झालेल्या कोकण पदवीधर मतदारसंघातील  शिवसेनेचे  उमेदवार  संजय मोरे यांच्या प्रचारार्थ झालेल्या मार्गदर्शनपर सभेमध्ये केले.

   कोकण पदवीधर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे यांच्या प्रचारानिमित्त आज पाली येथील बल्लाळेश्वर  भक्त निवास येथे एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी उपस्थित शिवसैनिक  लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांसह  पदवीधर संघातील मतदारांना आदित्य ठाकरे यांनी मार्गदर्शन केले .यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नामदार अनंत गीते, शिवसेनेचे खासदार सचिव अनिल देसाई, महाडचे आमदार भरतशेठ गोगावले, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई. शिवसेना जिल्हा सल्लागार, किशोर जैन, विरोधीपक्ष नेते सुरेद्र म्हात्रे, मुरुड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा पाटील, महिलाध्य्क्षा रेखा ठाकरे, सुधागड तालुकाप्रमुख मिलिंद देशमुख, जी.प. सदस्य रविद्र देशमुख, माजी जी.प. सदस्य राजीव साबळे, आदी मान्यवर उपस्थित होते.

   आपल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे यांनी विधान परिषदेची ही निवडणूक महत्त्वपूर्ण का आहे याबाबत स्पष्टीकरण देताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वताकदीवर राज्यात सत्ता आणण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग असल्याचे सांगितले .

या निवडणुकीबरोबर राज्यात एकूण चार निवडणुका विधान परिषदेच्या होत असून या सर्व ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला . विधान पदासाठीचीही निवडणूक तांत्रिक पद्धतीने जास्त असल्याने या ठिकाणी असलेले मतदार हे विधानसभा व लोकसभा मतदार संघांपेक्षा वेगळे असल्याने त्यांची झालेली नोंदणी ही शिवसेनेच्या फायद्याची असल्याचे मत व्यक्त केले .

विधान परिषदेची निवडणूक ही अत्यंत महत्त्वपूर्ण असून या निवडणुकीमधील नोंदणी झालेल्या मतदारांपैकी एकूण निम्म्यापेक्षा जास्त मतदार हे शिवसेनेचे असल्याने आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. कोकण पदवीधर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार  संजय मोरे हे एक प्रामणिक व निष्ठावंत शिवसैनिक असून ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यांच्या महापौर पदाच्या काळातच आलेल्या सर्व आव्हानाना अंगावर घेऊन मित्र व शत्रू पक्षाच्या विरोधात शिवसेनेने पुन्हा एकदा ठाण्यामध्ये एक हाती सत्ता मिळवली होती याची आठवण देऊन शिवसैनिक हा सदैव इतिहास घडवतो असे सांगून कोकण पदवीधर मतदार संघातील विजयासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे असे आवाहन केले . 

    या निवडणुकीतील प्रत्येक शिवसैनिकाने वीस मतदारांची यादी समोर ठेऊन प्रत्येकाशी संपर्क साधावा अशी सूचना  त्यानी केली . मुंबई सिनेटची निवडणूक जिंकली म्हणजे कामे संपली नसून आता प्रत्येक मतदाराशी संपर्क साधण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करताना विरोधी पक्षातील उमेदवार या पक्षातून त्या पक्षात  गेले असल्याने त्यांना प्रत्यक्ष मतदारसंघ व उमेदवारांची माहिती नसल्याचा टोला ठाकरे यांनी लगाविला.

    कोकण पदविधर मतदारसंघातील उमेदवार संजय मोरे यांनी आपल्या मनोगतामध्ये सागितले की शिवसेनेने माझ्यासारख्या सामान्य उमेदवाराला ही संधी देऊन सामान्य शिवसैनिकांचे सोने केल्याचे मत व्यक्त केले .आजकाल होणाऱ्या निवडणुका या सोशल मीडिया व अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधून जास्त पद्धतीने प्रचार करून होत असला तरीही आपली सर्व मदार शिवसेना युवा सैनिक व महिला आघाडीच्या सैनिकांवर अवलंबून असल्याने आपला विजय निश्चित असल्याची ग्वाही दिली .शिवसेने माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाला दिलेली उमेदवारी ही इतिहास घडविणारी असल्याने कोकणातील सर्व मतदारांनी केवळ निवडणुकीमध्ये जबाबदारी म्हणून नव्हे तर कर्तव्यपूर्तीच्या भावनेतून काम करावे असे आवाहन उमेदवार मोरे यांनी केले .

      या कार्यक्रमाला येण्यापूर्वी  युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी अष्टविनायक तीर्थक्षेत्रापैकी प्रसिद्ध असणाऱ्या बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले . या सभेसाठी सुधागड तालुक्यांसह उत्तर रायगड मधील रोहा, अलिबाग, मुरुड, पेण आदि तालुक्यातील सहसंपर्कप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, विभागप्रमुख, शहरप्रमुख, युवासेनेचे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पदाधिकारी, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, शिक्षक सेना व ग्राहक संरक्षण कक्ष व इतर शिवसेनेच्या सेलचे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत