कोकण पदवीधर: शिवसेनेकडून माजी महापौर संजय मोरे यांना उमेदवारी

मुंबई : रायगड माझा वृत्त 

विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेने ठाण्याचे माजी महापौर व उत्तर रायगड संपर्कप्रमुख संजय मोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेने प्रथमच उमेदवार दिला आहे. यापूर्वी भाजप-शिवसेनेची युती असताना ही जागा भाजप लढवत असे. मात्र, आता या दोन पक्षांच्या वेगळ्या वाटा झाल्याने शिवसेनेनेही आपला उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले आमदार निरंजन डावखरे यांना शिवसेनेच्या रूपाने मोठे आव्हान मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसही ही निवडणूक लढणार आहे. राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक नजीब मुल्ला किंवा शेकापचे जयंत पाटील यांच्या स्नुषा चित्रलेखा पाटील यांच्यापैकी एकाच्या गळ्यात उमेदवारी पडण्याची शक्यता आहे.

 

भाजप व शिवसेनेत काडीमोड झाल्याने या महिन्यात होणा-या विधान परिषदेच्या चारही जागा हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. भाजपने शिवसेनेसोबत विधान परिषदेच्या चार जागांसाठीही युती करण्याची तयारी दाखवली आहे. मात्र, शिवसेनेने ‘एकला चलो रे’ चा नारा दिला आहे. दुसरीकडे, काँग्रेस-राष्ट्रवादी व इतर मित्रपक्षांची आघाडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपला आव्हान मिळण्याची शक्यता आहे. त्यातच आता शिवसेनेने आपला उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याने पुन्हा आमदार होण्यासाठी राष्ट्रवादीतून खास भाजपमध्ये गेलेल्या निरंजन डावखरेंना ही निवडणूक जड जाईल असे बोलले जात आहे. राष्ट्रवादी आता कोणाला उमेदवारी देते ते पाहावे लागेल.

7 जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार-

मुंबई, कोकण विभाग पदवीधर आणि मुंबई, नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने मागील आठवड्यात जाहीर केला होता. त्यानुसार या चार विधानपरिषदेच्या जागांसाठी येत्या 25 जून रोजी मतदान होत आहे तर 28 जून रोजी मतमोजणी होईल. या निवडणुकीसाठी 7 जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत, तर 11 जूनपर्यंत आपले अर्ज मागे घेता येतील.

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले निरंजन डावखरे प्रतिनिधित्त्व करत आहेत तर मुंबई विभाग पदवीधर मतदारसंघातून राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक रामचंद्र सावंत हे प्रतिनिधित्त्व करत आहेत. या चारही आमदारांची 7 जुलै 2018 रोजी मुदत संपत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत