कोकण मतदार संघात भाजपचेच ‘डाव’ खरे ! अनंत गितेंचा गौप्यस्फोट खरा ठरला!

माणगांव : प्रवीण गोरेगांवकर

संपुर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक अखेर चुरशीची ठरत राष्ट्रवादीतून भाजपात आयात केलेल्या उमेदवाराचे डाव खरे होत कोकणातील भाजपाच्या प्रवेशाचे निरंजन शिलगले आहे. भाजपला कोकणात या निवडणूकीमुळे विजयाचे दरवाजे उघडे झाले असले तरी या निवडणूकीत पक्षनिष्ठा व तत्वे खुंटीला बांधुन ठेवल्याच्या शंका कुशंका व्यक्त होत आहेत.

या अटीतटीच्या निवडणूकीत शिवसेना भाजप व राष्ट्रवादी हे तीनही बलाढ्य पक्ष संपुर्ण ताकदीने उतरले होते. भाजपाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अचानक भाजपात गेलेले आ. निरंजन डावखरे यांच्यावरील रागाने खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी निरंजन डावखरे यांना पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोकण पदवीधर मतदारसंघात नजीब मुल्ला यांना उमेदवारी देऊन निवडणूक लढवली. मात्र या उमेदवाराचा फारसा प्रचार रायगडात पक्षाकडून झाला नसल्याचा आरोप निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्यात व आताही होत आहे.

शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे यांच्या जाहिरसभा ठिकठिकाणी झाल्या त्यामुळे शिवसेना व भाजप अशी सरळ लढत सामान्य नागरीकांनाही दिसत होती. मात्र शिवसेनेची माणगांवात प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सभा झाली. त्यावेळी केंद्रीय अवजड मंत्री ना. अनंत गीते यांनी या प्रकरणातील तटकरेंच्या भूमिकेची पोलखोल करीत आ. सुनिल तटकरे या निवडणूकीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत आपले चिरंजीव आ. अनिकेत तटकरे याला भाजपाने केलेल्या उपकाराची परतफेड करणार असा गौप्यस्फोट केला होता. तो अखेर खरा ठरला की काय अशी चर्चा रायगड जिल्ह्यात सर्वत्र सुरु असून नजीब मुल्ला यांना बळीचा बकरा बनवला असल्याची कुणकुण होत आहे.

राष्ट्रवादीकडे कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात कमी संख्याबळ असतांना अनिकेत तटकरे निवडून येऊ शकतात. मात्र पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीब मुल्ला तिसऱ्या क्रमांकावर फेकले जातात याचा अर्थ काय ? असे सर्वपक्षिय कार्यकर्ते विचारत आहेत. या राजकीय खेळीमुळे भाजपचे कोकणातील अखेर निरंजनसाठी ‘डाव’ खरे ठरले. 

रायगडध्ये राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर शेतकरी कामगार पक्षाची ताकदही जोडली गेली होती. अशा परिस्थितीत नजीब मुल्ला किमान दुसऱ्या क्रमांकावर रहातील अशी अपेक्षा होती. परंतू प्रत्यक्षात तसे न होता एकाकी लढणाऱ्या शिवसेनेचे संजय भाऊराव मोरे हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. तर नजीब मुल्ला थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. रायगडात राष्ट्रवादी शेकाप युती असून मोठी ताकद आहे. या युतीची काही मते व भाजपाची मते पकडली तरी मोठ्या फरकाने शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झालेला नाही. कोकणात भाजपला या निवडणूकीत चांगले यश मिळाले असून आगामी निवडणुकीत कोकणात कमळ फुलल्‍यास आश्चर्य वाटायला नको.

शेयर करा

One thought on “कोकण मतदार संघात भाजपचेच ‘डाव’ खरे ! अनंत गितेंचा गौप्यस्फोट खरा ठरला!

  1. या सरमिसळ पक्षाच्या हातमिळवनीमुळे कधी काय निकाल लागेल याचा अंदाज बांधणे अवघड पण जनता शिवसेनेला प्रथम पसंतीने स्विकारत आहे असे दिसुन येते

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत