कोकण रेल्वे मार्गावर पंधरा स्थानकांवर काम सुरू

रत्नागिरी : रायगड माझा वृत्त

कोकण रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक एकमार्गी रेल्वे लाईनमुळे सातत्याने कोलमडते, मात्र पुढील वर्षभरात हा प्रश्‍न आटोक्‍यात येणार आहे. सध्या २५० कोटी रुपयांची कामे पंधरा स्थानकांवर सुरू असून, ती पूर्ण झाल्यावर रेल्वे गाड्या वेळेत धावणार आहेत.

कोकण रेल्वे मार्ग सुरू झाल्यावर मुंबईकर चाकरमानी कोकणात सहज आणि कमी खर्चात प्रवास करू लागलेत. रोहा ते मडगावपर्यंत एकच रेल्वे मार्ग असल्यामुळे दिवाळी, गणपती किंवा उन्हाळी सुटीत जादा गाड्या सोडल्यावर वेळापत्रक कोलमडत होते. यावर उपाययोजना करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दुपदरीकरणाचा निर्णय घेतला. त्यासाठी ५ हजार कोटींचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला असून, तो या बजेटमध्ये मंजूर होईल, अशी आशा आहे.

तत्पूर्वी, तात्पुरती उपाययोजना म्हणून नवीन स्थानके आणि जुन्या स्थानकावर नियमित लाईनशिवाय दुसरी लूप लाईन बांधण्याचे काम हाती घेतले आहे. त्यात कळंबणी, खारेपाटण, कडवई नवीन स्थानके विकसित केली जात आहेत. इंदापूर, गोरेगाव, सापेवामने, वेरवली याठिकाणी गाड्यांना क्रॉसिंगसाठी नवीन लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी १५० कोटी रुपये निधी मंजूर आहे. ही कामे पुढील काही महिन्यात पूर्ण होतील.

त्याचबरोबर माणगाव, विन्हेरे, अंजणी, सावर्डे, आडवली, राजापूर, वैभववाडी या सात स्थानकांवर गाड्यांना क्रॉसिंगसाठी जादा लूप टाकण्याचे काम सुरू आहे. सावर्डे येथे नियमित लाईन बरोबर एक जादा लाईन आहे. नवीन कामात आणखी दुसरी लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. ही कामे या वर्षाअखेरीस पूर्ण होतील, अशी आशा आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत