कोटिफ कप फुटबॉल स्पर्धेत भारताने अर्जेंटिनाचा पराभव करत मिळवले विजेतेपद

माद्रिद : रायगड माझा ऑनलाईन 

भारताच्या २० वर्षाखालील फुटबॉल संघाने संपूर्ण देशाची मान जागतिक पातळीवर उंचावली आहे. स्पेनमध्ये झालेल्या कोटिफ कप फुटबॉल स्पर्धेत भारताने दिग्गज अर्जेंटिनाचा २-१ने पराभव करत विजेतेपद मिळवले.

अंतिम सामन्यात भारत आणि विजेतेपदामध्ये अर्जेंटिनासारख्या पारंपारिक आणि दिग्गज संघाचा अडथळा होता. इतक नव्हे तर १० खेळाडूंसह खेळताना भारतीय संघाने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. भारताकडून दीपक टांगडीने चौथ्या आणि अनवर अलीने ६८व्या मिनिटाला गोल केला.

भारतीय संघाच्या या कामगिरीमुळे देशातील फुटबॉलला नवी ऊर्जा मिळणार असल्याचे मानले जात आहे. अंतिम सामन्यात भारतीय संघाने सहा वेळा २० वर्षाखालील विश्वचषकाचे विजेतेपद मिळवणाऱ्या अर्जेंटिना संघाचा पराभव केला.

सामन्यातील चौथ्या मिनिटाला एन मीताईने कॉर्नरवर मारलेल्या शॉटवर टांगडीने हेडरद्वारे पहिला गोल केला. सामन्याच्या सुरुवातीलाच गोल करत भारताच्या संघाने खळबळ उडवून दिली. त्यानंतर देखील भारताने आक्रमक खेळ केला. पहिल्या हाफपर्यंत भारताकडे १-० अशी आघाडी होती.

दुसऱ्या हाफमध्ये कर्णधार अमरजीत सिंहने दिलेल्या पासवर गोल करण्याची संधी हुकली. त्यानंतर भारताच्या अनिकेत जाधव याला ५४व्या मिनिटाला रेड कार्ड देण्यात आले. त्यामुळे भारताला १० खेळाडूंसह खेळावे लागेल. पण एक खेळाडू कमी झाल्याचा कोणताही परिणाम भारताच्या आक्रमकतेवर झाला नाही. ६८व्या मिनिटाला अनवर अलीने गोल करत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. अर्जेंटिनाने अखेरच्या काही मिनिटात एकमात्र गोल केला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत