“कोणीतरी उद्धव ठाकरेंना च्यवनप्राश द्या”-निलेश राणे

महाराष्ट्र News 24 वृत्त

गुरुवारी विधानसभेमध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या मुद्द्यासंदर्भात केंद्राच्या भूमिकेचा समाचार घेतला. “बाहेरील देशातील हिंदूंना न्याय देण्यासाठी केंद्र सरकारने नागरिकतेच्या कायद्यात दुरुस्ती केली. पण देशातील हिंदूंना कधी न्याय देणार, असा सवाल ठाकरे यांनी केला. बाहेरील हिंदूंना नागरिकतेचा हक्क दिल्यावर त्यांना आश्रय कुठे देणार ते सांगा”, असा सवाल उद्धव यांनी केंद्र सरकारला केला. “बेळगाव, कारवार या सीमाभागातील मराठी बांधवांवर आजही भाषेच्या आधारावर अन्याय होत आहे. बेळगाव, कारवारमध्ये राहणारे मराठी भाषक हे हिंदू नाहीत का,” असे विचारत सीमा भागाचा उल्लेख उद्धव यांनी ‘कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र’ असा केला. “हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून त्यात गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारने महाराष्ट्राची नव्हे तर कर्नाटकची बाजू घेतली,” असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

मात्र उद्धव यांच्या याच वक्तव्यावरुन निलेश राणे यांनी एक ट्विट केलं आहे. यामध्येय त्यांनी बेळगाव प्रश्न हा भाषिक मुद्दा असल्याचं म्हटलं आहे. “कोणीतरी ह्या माणसाला च्यवनप्राश द्या. कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र हा विषय भाषेचा आहे धर्माचा नाही. काही माणसांचं वय वाढलं तरी त्यांना अक्कल येत नाही,” असं निलेश यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात मागील काही दिवसांपासून आंदोलने सुरु आहेत. याचे पडसाद गुरुवारी राज्यातील विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातही पहायला मिळाले. देशातील हिंदूंना केंद्र सरकार कधी न्याय देणार असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल बोलताना त्यांनी बेळगाव, कारवार येथील सीमाभागांमधील मराठी बांधवांचा उल्लेख केला. या वक्तव्यावरुनच आता माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. “काही माणसांचं वय वाढलं तरी त्यांना अक्कल येत नाही,” असा टोला निलेश यांनी ट्विटवरुन उद्धव यांना लगावला आहे.

निलेश यांनी अशाप्रकारे उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. राज्यातील सत्तास्थापनेचा संघर्ष शिगेला पोहचलेला असतानाही अनेकदा निलेश यांनी ट्विटवरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत