‘कोण म्हणतंय आमच्याकडे संख्याबळ नाही?’ सोनिया गांधींचे सूचक विधान

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त :

‘अविश्‍वास प्रस्तावावरील मतदानासाठी आमच्याकडे ‘आवश्‍यक’ संख्याबळ नाही, असं कोण म्हणतंय’, असे सूचक विधान ‘संयुक्त पुरोगामी आघाडी’च्या (यूपीए) अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज (बुधवार) केले. तेलगू देसम पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला . लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी हा प्रस्ताव दाखल करून घेतला आहे.

केंद्र सरकारविरोधातील अविश्‍वास प्रस्तावावर येत्या गुरुवारपासून लोकसभेत चर्चा सुरू होईल. लोकसभेत शुक्रवारी, तर राज्यसभेत सोमवारी या प्रस्तावावर मतदान होईल.

या अविश्‍वास प्रस्तावामुळे मोदी सरकारला पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. भाजपप्रणित ‘एनडीए’तून बाहेर पडलेल्या तेलगू देसमनेच अविश्‍वास ठराव दाखल केल्याने विरोधी पक्षांना बळ मिळाले आहे. अविश्‍वास प्रस्तावावरील मतदानामध्ये ‘एनडीए’मध्ये सध्या असलेले, तरीही भाजपशी पटत नसलेले पक्ष काय करणार, याकडे आता राजकीय विश्‍लेषकांचे लक्ष आहे. भाजपशी पटत नसूनही सत्तेत असलेले काही पक्ष किंवा खासदार या अविश्‍वास प्रस्तावामध्ये विरोधी पक्षांना मदत करण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

याच पार्श्‍वभूमीवर सोनिया गांधी यांनी ‘कोण म्हणतंय आमच्याकडे संख्याबळ नाही’ हे सूचक विधान केले आहे. दुसरीकडे, ‘केंद्र सरकार अविश्‍वास प्रस्तावाला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहे. आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे’, असे संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी सांगितले.

यापूर्वी तेलगू देसमच्या खासदारांनी अर्थसंकल्पी अधिवेशनामध्येही अविश्‍वास प्रस्ताव मांडला होता; पण त्यावेळी लोकसभेच्या अध्यक्षांनी हा प्रस्ताव फेटाळला होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत