कोण होणार माणगांवचा नगराध्यक्ष? 

 माजी आमदार सुनिल तटकरे पुन्हा जादूची कांडी फिरवणार की राजीव साबळे मात करणार!

माणगांव : प्रवीण गोरेगांवकर

रायगड जिल्ह्याच्या राजकारण ढवळून टाकलेल्या माणगांव नगरपंचायत निवडणूकीत चांगलाच ट्विस्ट आला आहे. नगराध्यक्षपदाची निवडणूक तोंडावर आलेली असतांनाच शिवसेनेने डाव साधल्याची चर्चा सर्वत्र आहे. राजकारणाचे केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणगांव नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस 11, शिवसेना 5 तर राष्ट्रीय काँग्रेस 1 असे पक्षीय बलाबल आहे. परंतू सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन नगरसेविका विरोधी शिवसेना व राष्ट्रीय काँग्रेसच्या सोबत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाऱ्यांची चांगलीच  झोप उडाली आहे. या निवडणूकीची जोरदार चर्चा माणगांव तालुक्यातसह  संपुर्ण रायगड जिल्ह्यात रंगली आहे.

कोण होणार माणगांवचा नगराध्यक्ष

माणगांव नगरपंचायतीच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला धुळ चारीत एकहाती सत्ता मिळवली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी आमदार सुनिल तटकरे यांनी सुरुवातीच्या अडीच वर्षासाठी आनंदशेठ यादव यांना नगराध्यक्ष पदाची तर रत्नाकर उभारे यांना एक वर्षासाठी उपनगराध्यक्षपदाची संधी दिली. नगराध्यक्ष पदाच्या अडीच वर्षाच्या कालावधीनंतर शासन निर्णयाप्रमाणे पुन्हा 24 जुलै रोजी उर्वरीत अडीच वर्षाकरीता नगराध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. नगराध्यक्ष या पदासाठी महिला सर्वसाधारण आरक्षण असल्यामुळे पाचही नगरसेविका इच्छुक होत्या. त्यामुळे सर्वाना समान संधी देण्याचा विचार सुरु होता. तशी चर्चा करीत अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवसापर्यंत रात्री 1 वाजेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सदस्य एकत्रित होते. परंतू दुसऱ्या दिवशी प्रत्यक्षात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन नगरसेविका अचानक बेपत्ता झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्काच बसला. सुरुवातीला नगराध्यक्षपद आपल्यालाच मिळाले पाहिजे अशी सर्वांची मागणी होती. त्यावर चर्चाही सुरु होती परंतू आता ते काही आल्याला मिळणार नाही अशी ठाम खात्री काही नगरसेविकांची झाल्यामुळे त्या नाराज होत्या. या संधीचाच फायदा घेत विरोधी शिवसेना व काँग्रेस पक्षाने एकत्रित येत सौ. योगिता चव्हाण व सौ. अंजली पवार यांचे नामनिर्देशन अर्ज शेवटच्या दिवशी सादर केले.

नगरपंचायतीत पराभव स्विकारावा लागल्याने राजीव साबळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत चांगलेच यश मिळवीत नगरपंचायत निवडणूकीचा बदला घेतला होता. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या विधानपरिषद निवडणूकीत आ.सुनिल तटकरे यांनी आपल्या सर्वच विरोधी पक्षांना एकत्र करीत माणगांवच्या राजीव साबळे यांना पराभवाची धुळ चारली होती. आताच्या नगरपंचायत निवडणूकीत या पराभवाचे उट्टे काढण्याची संधी राजीव साबळे सोडणार नाही अशीच चर्चा माणगावात आहे. या तिनही नगरसेविका शिवसेना व काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका यांच्यासोबतच अज्ञात स्थळी गेल्या असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आता माणगांव नगरपंचायतीवर शिवसेना काँग्रेस युतीचाच नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष बसतील असे ठामपणे बोलले जात आहे.

नगरपंचायतीची निवडणूक पक्षीय चिन्हावर लढविलेली असल्याने सर्व नगरसेवकांना पक्षांतरबंदी कायदा लागू होतो. परंतू पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई केल्यानंतर त्याचा निर्णय लागेपर्यंत नविन निवडणूक लागलेली असेल याची खात्री सर्वच नगरसेवकांना असल्याने या निवडणूकीत सत्तापालट होण्याचीच चिन्हे अधिक आहेत.  याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी शिवसेना व राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतेमंडळी व नगरसेवकांजवळ संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सर्वचजण नॉट रिचेबल आहेत. 

काही नगरसेवक,नगरसेविका आता गेलेले असतील तरी ते आमचेचे आहेत. त्यामुळे त्यांना उघडपणे विरोधात जाता येणार नाही. त्यांचा राग शमवून आम्ही त्यांना सोबत घेण्यात यशस्वी होऊ. सर्वजण चिन्हावर निवडून आले आहेत त्यामुळे त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होतो. ते न ऐकून स्वत:च्या पायावर दगड मारून घेतील. लोकांनी त्यांना पक्षाच्या चिन्हावर निवडून दिले आहे त्यांचीही फसवणूक होईल.  

प्रमोद घोसाळकर, रायगड जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत