कोरोनाबाधित मृत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी सरसावले पोलीस व आरोग्य यंत्रणा

श्रीवर्धन : साहिल रेळेकर

ग्रामस्थांची जागरूकता आणि पोलिसांच्या सजगता; वांजळे गावातील प्रकार

वांजळे ग्रामस्थांनी मानले पोलिसांचे व आरोग्य यंत्रणेचे आभार

कोरोनाच्या पहिल्या दिवसापासून आपल्या जीवाची पर्वा न करता पोलीस प्रशासन चोखपणे आपले कर्तव्य बजावत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना व निर्बंधासह पोलीस प्रशासन दिवसरात्र झटत आहे. असाच एक अनुभव सोमवारी रात्री श्रीवर्धन तालुक्यातील वांजळे याठिकाणी घडला. आपले कर्तव्य बजावताना कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वांजळे गावातील एका कोरोनाबाधित मृत व्यक्तीचा अंत्यविधी करण्यासाठी पोलिसांसह आरोग्य यंत्रणेने माणुसकीचे दिव्यदर्शन घडवले आहे. मौजे वांजळे हनुमानवाडी येथील ८७ वर्षीय बाबू सोनू काते यांना कोरोनाची बाधा झाल्याने ते श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र दुर्दैवाने सोमवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास काते यांचे कोरोनाने निधन झाले.

वांजळे गावात कोरोनाबधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याची पहिलीच घटना असल्याने तसेच वांजळे गाव अत्यंत दुर्गम परिसरात असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोरोनाबाधित व्यक्तीचा अंत्यविधी करणे कुटुंबियांसाठी व गावकऱ्यांसाठी धोक्याचे होते. त्यामुळे वांजळे ग्रामस्थांनी सदरची बाब दिघी सागरी पोलिसांना तात्काळ संपर्क साधून त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्याअनुषंगाने दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस नाईक संदीप चव्हाण, पोलीस नाईक सावंत, होमगार्ड घाडगे तात्काळ घटनास्थळी हजर झाले. समवेत बोर्ली पंचतन प्रथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सूरज तडवी व त्यांचे कर्मचारी तसेच पोलीस पाटील उद्देश वागजे, श्रीराम काळदेवकर, सर्फराज दर्जी, अमोल चांदोरकर व वांजळे ग्रामस्थांच्या सहकार्याने तात्काळ सदर मयताच्या शवाचे विधिपूर्वक अंत्यविधी करण्यात आले. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अंत्यविधीदरम्यान पीपीई किटचा वापर करण्यात आला होता. पोलिसांच्या व आरोग्य यंत्रणेच्या या महान कार्याचे व वांजळे ग्रामस्थांच्या जागरूकतेचे सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे.

१) “वांजळे गावात कोरोनाबधिताचा मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खबरदारी घेत सदरची बाब पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच सर्व ग्रामस्थांनी अंत्यविधीसाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य केले. दिघी सागरी पोलिसांचे व आरोग्य विभागाचे ग्रामस्थांच्या वतीने मनःपूर्वक आभार.”
– सुबोध बिरवाडकर (ग्रामस्थ)

२) “सदरची दुर्दैवी घटना मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी व वांजळे ग्रामस्थांनी जागरूकतेने पोलीस प्रशासन व आरोग्य यंत्रणेच्या तात्काळ निदर्शनास आणून दिली. कोरोनाबधिताचा अंत्यविधी करण्यासाठी वांजळे ग्रामस्थांनी देखील प्रशासनाला हातभार लावला. ग्रामस्थांच्या जागरूकतेबद्दल आभार.”
– संदीप पोमण (सहाय्यक पोलीस निरीक्षक, दिघी सागरी पोलीस ठाणे)

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत