कोल्हापुरात औषध तुटवड्याचा फटका गरीब रुग्णांना

कोल्हापूर : रायगड माझा वृत्त 

Image result for kolhapur shaskiya rugnalaya

गोरगरीब रुग्णांना लागणारी औषधेही येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात (सीपीआर) उपलब्ध नाहीत. शहरासह जिल्ह्यात संसर्गजन्य आजारांचा विळखा वाढला असतानाच ॲन्टीबायोटिक्‍सही उपलब्ध नाहीत. सर्व प्रकारच्या औषधांचा तुटवडा तेथे आहे. एरवी पैसे नाहीत म्हणून औषधांची खरेदी केली जात नाही. पण मुंबईतील एका खासगी एजन्सीला दोन कोटी रुपये देऊनही सहा महिन्यांपासून औषधांचा पुरवठा झालेला नाही; तर दुसऱ्या बाजूला जिल्हा नियोजन मंडळाकडून दिला जाणारा औषध निधीही २०१६ पासून ‘सीपीआर’कडून उचललेला नाही. त्यामुळे औषध खरेदीतल्या घोळाचा फटका रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना बसत आहे. राज्य सरकारने एकाच कंपनीकडे औषध पुरवठा करण्याचा ठेका दिल्याने घोळ निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, सरकारी पैसा रुग्णांच्या उपचारासाठी आहे की, एखाद्या ठेकेदार एजन्सीचे उखळ पांढरे करण्यासाठी? असा सवालही उपस्थित केला जात आहे. ‘सीपीआर’मध्ये रोज शेकडो रुग्ण दाखल होतात; तर हजारो रुग्ण रोज बाह्यरुग्ण विभागात उपचारांसाठी ये-जा करतात. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण ‘सीपीआर’मध्ये येतात. थोरला दवाखाना म्हणूनच ‘सीपीआर’ची ओळख आहे.

बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची डॉक्‍टरांनी तपासणी केल्यानंतर अथवा ॲडमिट रुग्ण तपासल्यानंतर डॉक्‍टर औषधे लिहून देतात. औषधे आजवर नेहमी ‘सीपीआर’मध्ये उपलब्ध असत. पण, काही महिन्यांपासून औषधांचा तेथे तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णांना कोणत्याच प्रकारची औषधे मिळत नाहीत. ॲन्टीबायोटिक्‍स, विविध प्रकारच्या सिरिंग्ज, सलाईन, ड्रेसिंग साहित्य, खोकल्यावरची औषधे, विविध प्रकारचे मलम, रेबीज लस हे सरकारी पैशातूनच  दिले जातात. ‘सीपीआर’मध्ये येणारे रुग्ण हे गरीब असतात. त्यामुळे सरकारी पैशांतूनच त्यांना औषधे दिली जातात.

जानेवारीत ‘सीपीआर’ने औषध खरेदीसाठीचे दोन कोटी रुपये संबधित कंपनीला दिलेले आहेत. मात्र, या पैशातून कोणतीच औषधे उपलब्ध झालेली नाहीत. राज्य सरकारने एकाच कंपनीकडे राज्यभरातील औषधांचा पुरवठा करण्याचे काम दिले आहे. पण, या कंपनीकडून कोणतीच औषधे मिळालेली नाहीत, अशा तक्रारी ‘सीपीआर’मधूनही केल्या जात आहेत. रोज रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि डॉक्‍टर व परिचारिका यांच्यात वादावादी होत आहे.

औषधांचा निधी पडून
दरवर्षी ‘सीपीआर’मधल्या रुग्णांच्या औषधासाठी नियोजन समितीतून निधीची तरतूद करण्यात येत आहे. २०१६ पासून हा औषधांसाठीचा निधी उचललेला नाही. तीन वर्षे होत आली तरी २०१६ चा निधी ‘सीपीआर’ने खर्च टाकलेला नाही.
– सरिता यादव, जिल्हा नियोजन अधिकारी

मराठवाड्यातली औषधे पश्‍चिम महाराष्ट्रात
औषध खरेदी आणि पुरवठ्याचे काम एकाच ठेकेदार कंपनीकडे आहे, यात ताळमेळ दिसून येत नाही. त्यामुळे मराठवाडा विभागाने मागविलेली औषधे पश्‍चिम महाराष्ट्राला पाठविली जातात. त्याचा काहीच उपयोग नाही. तर कोकण व पश्‍चिम महाराष्ट्राला लागणारी औषधे मराठवाड्याकडे पाठविली जातात. त्याचा तिकडे काही उपयोग होत नाही, असेही येथील काही कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. औषध खरेदीतल्या या गोंधळात सरकारचा पैसा, वेळ तर वाया जातच आहे.

‘सीपीआर’मध्ये औषधे कमी आहेत, ही वस्तुस्थिती आहे. उसनवारी व अन्य योजनांतून मिळणाऱ्या औषधांवरच रुग्णांवर उपचार करीत आहोत. रेबीज लस उसनवारीवरच आणली आहे. रुग्णांचा ताण व मिळणारी औषधे यांचा ताळमेळ लागलेला नाही. जानेवारीपासून औषधाची खरेदीच झालेली नाही. तरीही स्वाईन फ्लू, डेंगी यांसारख्या रुग्णांवरही उपचार करीत आहोत.
– डॉ. रघूजी थोरात, अधिष्ठाता, सीपीआर

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत