कोल्हापूरमध्ये तलवार हल्ला; दोघे जखमी घरावर दगडफेक

कोल्हापूर : रायगड माझा वृत्त

वाढदिवशी रात्री फटाके वाजवल्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मंगळवारी सुभाषनगरमध्ये तलवार हल्ला व घरावर दगडफेक करण्यात झाले. यामध्ये वासीम अल्लाबक्ष मुजावर (वय ३३) आणि इरफान अल्लाबक्ष मुजावर (२९) हे दोघे जखमी झाले.

सुभाषनगरमधील सिरहाज मोहल्ला येथे सोमवारी अरबाज नावाच्या युवकाचा वाढदिवस होता. त्यामुळे रात्री १२ वाजता फटाके वाजवण्यात आले. यामुळे वासिमची मुलगी झोपेतून जागी झाली. त्यामुळे वासीम व इरफान हे दोघे भाऊ अरबाजला जाब विचारण्यासाठी गेले. तेथे धक्काबुक्कीही झाली. मात्र, भांडण मिटवण्यात आले.

मंगळवारी सकाळीही काही ज्येष्ठ मंडळींनी हा वाद मिटवून टाकला. मात्र, रात्री साडेआठच्या सुमारास ३० ते ४० जणांनी मुजावर यांच्या घरावर दगडफेक केली, त्यांना तलवारीने मारहाण केली, घराची नासधूस केली. यामध्ये इरफानच्या नाकाला, तर वासीमच्या डोक्याला जखम झाली आहे. याप्रकरणी अन्वर शेख, सिद्धिक शेख, रफिक शेख, मुजवकील शेख या चौघांविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या दोघा जखमींवर रात्री सीपीआरमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत