कोल्हापूर : कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प नोव्हेंबरपासून कार्यान्वित

कोल्हापूर : रायगड माझा वृत्त 

कचऱ्यापासून वीजनिर्मितीच्या चाचण्या यशस्वी झाल्या असून, यातून बाहेर पडणारे इंधनाचे काय करायचे, हा प्रश्‍न सुटला की प्रत्यक्ष वीजनिर्मितीस सुरवात होईल. प्रत्यक्ष सुमारे ७० ते ८० टन कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रयोगही सुरू झाला आहे. नोव्हेंबरअखेर प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्याची शक्‍यता आहे.

शहरात दररोज सुमारे १८० टन कचरा जमा होतो. त्यापासून वीजनिर्मितीस सुरवात होईल. ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ अर्थात बीओटी तत्त्वावर कोल्हापूर ग्रीन एनर्जी या संस्थेला हा ठेका दिला गेला आहे. गेले वर्षभर याचे काम रखडले होते. बायोगॅस आणि कचऱ्याच्या वर्गीकरणाच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. महापालिका टनामागे संबंधित ठेकेदाराला ३०० रुपये देणार आहे. ३० वर्षांसाठी हा करार आहे.

वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारण्यात अडचणी निर्माण झाल्या. बॅंका कर्ज देण्यास तयार नव्हत्या. महापालिकेने प्रकल्पासाठी सहकार्य केले. वीजनिर्मितीच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. दररोज ७० ते ८० टन कचऱ्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल.
– प्रदीप आडके,
 कन्सल्टंट, कोल्हापूर ग्रीन एनर्जी.

शहरातील कचरा उठावाचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. वाढती नागरी वस्ती आणि उपनगरातील कचरा गोळा करताना महापालिकेच्या नाकीनऊ येते. सध्या कंटेनरच्या माध्यमातून कचरा उचलला जातो. शहरातील अरुंद रस्त्यांच्या तुलनेत कंटेनरचा आकार मोठा आहे. त्यामुळे लोखंडी कोंडाळ्यातून कचरा उचलताना कसरत होते. टोप खाणीचा निकाल पालिकेच्या बाजूने लागला आहे. मात्र, जागा मोजणीचा अर्ज देण्यापलीकडे हालचाली झालेल्या नाहीत.

सध्या कसबा बावडा येथे झूम प्रकल्पावर कचरा आहे, तो टाकाळा येथील साईटवर हलवून त्याच्यावर काँक्रिट केले की झूम प्रकल्पावर प्रत्यक्ष वीजनिर्मितीस सुरुवात होईल. मांस, भाजीपाला, खाद्यपदार्थांसह प्लास्टिक असा मोठ्या प्रमाणावर कचरा गोळा होतो. कचऱ्याच्या ढिगाला आग लागण्याचेही प्रकार घडले आहेत.

कचऱ्याची दुर्गंधी, त्यातील मांस यामुळे भटक्‍या कुत्र्यांची संख्या येथे मोठी आहे. लाईन बाजार परिसरातील नागरिक कचऱ्याचा त्रास अनुभवत आहेत. कोल्हापूर ग्रीन एनर्जीने अडचणींना तोंड देत प्रकल्प उभा केला. ३० टन कचऱ्यापासून २०० किलोवॅट इतकी वीजनिर्मिती होईल. सध्या ७० ते ८० टन कचऱ्यावर प्रयोग सुरू झाला आहे. कचऱ्यातील कागद, झाडांच्या फांद्या, ज्या खाद्यपदार्थांपासून खत तयार होत नाही, त्याच्याही वर्गीकरणाची चाचणी यशस्वी झाली आहे. प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या इंधनाचे काय करायचे? याचा प्रश्‍न निकाली निघाला असून, नोव्हेंबरअखेर प्रकल्प पूर्णक्षमतेने कार्यान्वित होण्याची शक्‍यता आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत