कोल्हापूर महापौर निवडणुकीत शिवसेना राहणार तटस्थ

मुंबई : रायगड माझा वृत्त

कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या मदतीशिवाय महापौर बनविणे भाजपसाठी कठीण बनले असून भाजपला सर्व प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे.

कोल्हापूरच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने तटस्थ राहावे, असा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी घेतला. अलिकडेच एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच गाडीतून प्रवास केला होता. त्यामुळे युतीचे इंजिन रुळावर आल्याची चर्चा जोरदार पसरली होती. मात्र त्यानंतर लगेचच उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मंत्री तसेच पदाधिकारी यांची एक बैठक बोलावत दुष्काळाच्या प्रश्नावरून सरकारला घेराव घालण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता कोल्हापुरात तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला असल्याने युतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची प्रचिती येत आहे.

कोल्हापूर महापालिकेत शिवसेनेचे चार नगरसेवक असून भाजपला त्यांचा महापौर बनवायचा असल्यास या चार नगरसेवकांचा पाठिंबा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मात्र शिवसेनेच्या नगरसेवकांना तटस्थ राहण्याचे आदेश रविवारी मिळाले आहेत. शिवसेना कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर तसेच आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडे या चार नगरसेवकांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या चारही नगरसेवकांना महाबळेश्वर येथे अज्ञात ठिकाणी हलविण्यात आले असल्याचे कळते. दरम्यान, शिवसेनेचे चार नगरसेवक तटस्थ राहिल्यास भाजपला त्यांचा महापौर बनविणे कठीण बनणार आहे. साहजिकच शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय महापौर बनविण्यासाठी भाजपची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत