कौटुंबिक सिनेमा ‘चुंबक’ महाराष्ट्रात मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होण्याकरिता सज्ज

रायगड माझा वृत्त

अक्षय कुमार प्रस्तुत आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते संदीप मोदी दिग्दर्शित भावनिक कौटुंबिक सिनेमा ‘चुंबक’ महाराष्ट्रात 27 जुलै 2018 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होण्याकरिता सज्ज

बॉलीवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारची प्रस्तुती असलेला बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट ‘चुंबक’ महाराष्ट्रात सर्वत्र २७ जुलै २०१८ रोजी प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. दोनवेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेले प्रख्यात गीतकार आणि गायक स्वानंद किरकिरे यांनी ही घोषणा पुणे येथे केली. ते पहिल्यांदाच मराठी चित्रपटात काम करत आहेत आणि प्रमुख भूमिका असलेला हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे.

या चित्रपटातून पदार्पण करत असलेला पुणे येथील साहिल जाधव आणि कोल्हापूर येथील संग्राम देसाई, चित्रपटाचे दिग्दर्शक राष्ट्रीय पुरस्कार विजेते संदीप मोदी तसेच ‘हापूस’, ‘ताऱ्यांचे बेट’ आणि ‘हृदयांतर’ फेम सौरभ भावे त्याचप्रमाणे सिनेमाचे  निर्माते नरेन कुमार हे मान्यवरही यावेळी उपस्थित होते. पुणे येथील पीव्हीआर सिनेमा येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. अरुणा भाटीया, केप ऑफ गुड फिल्म आणि कायरा कुमार क्रिएशन हे या चित्रपटाचे सहानिर्माते आहेत.

अक्षय कुमारने या चित्रपटाची प्रस्तुती करायची घोषणा सोशल मीडियावर अस्सल मराठीत केल्यापासून मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाचा बोलबाला आहे. अक्षय कुमारने या चित्रपटाबद्दल बोलताना म्हटले आहे की, तुम्ही आयुष्यात ज्या निवडी करता त्यांबद्दल हा चित्रपट भाष्य करतो. “तुम्ही आधी तुमच्या आयुष्यातील निवड घडवता आणि नंतर निवड तुम्हाला घडवते,” तो म्हणतो. ‘चुंबक’ची प्रस्तुती करण्याची निवड अक्षय कुमार यांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर घेतला. या चित्रपटाबद्दल आणि त्याच्या कथेबद्दल बोलताना अक्षय कुमार म्हणाला की, हा चित्रपट प्रत्येक कुटुंबाने एकत्र बसून पाहिला पाहिजे, असा आहे. “हा चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या मनात पहिली कोणती भावना आली असेल तर ती म्हणजे हा चित्रपट मी माझ्या मुलांबरोबर पहिला पाहिजे. याची कथा जीवनातील मूल्यांचे महत्व तुम्हाला पटवून देते. आज आपल्या आयुष्यात मूल्यांचे महत्व कमी होत असताना चित्रपट तुम्हाला ही मुल्ये आणि इतर भौतिक गोष्टी यामंधील फरक उलगडून सांगतो. चांगले काय आणि वाईट काय, हे शिकवतो आणि त्यातून कशाची निवड करायची हे अधोरेखित करतो. म्हणूनच प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना दाखवावा असा हा चित्रपट आहे,” तो म्हणतो.

स्वानंद किरकिरेने यांतील प्रसन्नाची मध्यवर्ती भूमिका सकारली आहे. ही भूमिका पाहिल्यानंतर या भूमिकेने या चित्रपटाशी जोडले जाण्यास मला भाग  पाडले, असे अक्षय कुमारने सोशल मीडियावर म्हटले  होते. किरकिरे त्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना म्हणतो, “ही भूमिका एक आव्हानच नाही तर ती माझ्यासाठी एक भेटसुद्धा होती. या भूमिकेने मला माझ्या आयुष्यातील अनेक महत्वाचे धडे शिकवले आणि आयुष्याच बदलून टाकले आहे.”   स्वानंद किरकिरे पुढे म्हणतो, “मला सुरुवातीला असे वाटले की या चित्रपटाच्या संगीतासाठी चित्रपटाची टीम मला भेटते आहे. पण माझ्याकडून त्यांना अभिनय करून घ्यायचा आहे आणि त्यातही ही मुख्य भूमिका आहे, असे जेव्हा मला कळले तेव्हा मला धक्काच बसला. ही भूमिका म्हणजे एक आव्हान होते. पण चित्रपटाची पटकथा ऐकली आणि माझ्यावरील या टीमचा विश्वास बघितला व आम्ही म्हणजे मी, संदीप, सौरभ आणि नरेन यांनी त्यात उडी घ्यायचे ठरवले.”

दिग्दर्शक संदीप मोदी आणि निर्माते नरेन कुमार यांनी म्हटले आहे की, ‘चुंबक’ हा साध्या सरळ माणसांच्या आयुष्यातील घटनांवर आणि त्यांच्या आयुष्यातील द्विधा मनस्थितींवर आधारित एक विनोदी चित्रपट आहे. म्हणूनच ही कथा आपल्याला आपली वाटते.

दिग्दर्शक संदीप मोदी यांनी अगोदर सोनम कपूर अभिनित ‘नीरजा’ या सिनेमाचे सह-दिग्दर्शन केले होते. याशिवाय त्यांनी आशुतोष गोवारीकर, राकेश ओमप्रकाश मेहरा आणि अगदी राम गोपाल वर्मांसारख्या दिगज्जांसोबत काम केले आहे. संदीप यांनी अनेक पुरस्कार विजेत्या लघुपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले असून फिचर लेंथ फिल्म म्हणून चुंबक हा त्यांचा पहिलाच सिनेमा आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत