क्राईम कॅपीटल: भाजप कार्यकर्त्यासह कुटुंबातील 5 जणांची निर्घृण हत्या; मेहुण्यानेच घडवून आणले हत्याकांड

नागपूर :  रायगड माझा

 अलिकडच्या काळात वाढलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे ‘क्राईम कॅपीटल’ अशी नवी ओळख मिळालेल्या नागपूरकरांची सोमवारची (ता.11) पहाट रक्तरंजीत ठरली. भाजपाचे कार्यकर्ते कमलाकर पवन यांच्या कुटुंबातील पाच जणांची रविवारी मध्यरात्री सशस्र हल्लेखोरांनी निर्घृण हत्त्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. ही थरकाप उडवणारी घटना नागपुरातील दिघोरी आराधना नगर येथे घडली आहे.

अंगावर काटा आणणारे हे क्रुर हत्याकांड कमलाकर पवनकर यांचा साळा विवेक पालटकर यानेच घडवून आणल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले असून फरार विवेकचा पोलिस कसून शोध घेत आहेत.

कमलाकर पवनकर यांच्यासह कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आली आहे. मृतांमध्ये लहान मुले व वृद्ध महिलेचा समावेश आहे. या हत्याकांडात भाजप कार्यकर्ते कमलाकर पवनकर (51), पत्नी वंदना पवनकर (40), मुलगी वेदांती पवनकर (12) आणि आई मीराबाई पवनकर (72) यांची हत्या करण्यात आली आहे. तर कमलाकर यांचा दोन वर्षाचा भाचा कृष्णा पालटकर याचीही क्रुर हत्या करण्यात आली आहे. कमलाकर पवन यांची लहान मुलगी मिताली व भाची वैष्णवी दुसऱ्या खोलीत झोपलेल्या असल्यामुळे थोडक्यात बचावल्या.

या भीषण हत्याकांडातून बचावलेल्या वैष्णवी आणि मिताली सोमवारी सकाळी जवळच राहणाऱ्या नातेवाईकांच्या घरी पोहचल्या. भेदरलेल्या दोघी काहीही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. त्यामुळे नातेवाईकांमार्फत पोलिसांनी रात्री घरात कुणी आले होते का, अशी त्यांना विचारणा केली. मितालीने मामा (आरोपी विवेक) होता, असे सांगितले.

मामा रात्री मुक्कामी थांबला होता, मात्र भल्या सकाळीच तो निघून गेल्याने पोलिसांना संशयाची कडी मिळाली. त्याआधारे तपास सुरू झाला. त्यानंतर पवनकर यांच्या नातेवाईकांनी आरोपीच्या पापाचा पाढाच पोलिसांसमोर वाचला. त्यानुसार, कमलाकरची पत्नी अर्चना हिचा सख्खा भाऊ असलेल्या विवेक पालटकरची गावाकडे वडिलोपार्जित जमीन आहे. पत्नीच्या हत्येच्या आरोपात न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली. त्यानंतर त्याच्या सुटकेसाठी कमलाकर यांनी बरीच धावपळ केली. त्याची मुले मिताली अाणि कृष्णा यांना स्वत:च्या मुलांप्रमाणे वाढविले. आरोपी विवेकला कारागृहातून बाहेर काढण्यासाठी तसेच कोर्टकचेरीच्या कामात त्यांनी सुमारे पाच लाख रुपये खर्च केले. कमलाकर यांनी केलेल्या या धावपळीमुळेच उच्च न्यायालयातून आरोपी विवेकची सुटका झाली होती.

कारागृहातून सुटका झाल्यानंतर आरोपी विवेकचे बहिण अर्चना आणि जावई कमलाकर यांच्या घरी जाणे येणे होते. साधारणत: दर रविवारी गरम पार्टी होत होती. याच दरम्यान, कोर्ट कचेरीसाठी खर्च झालेले सुमारे पाच लाख रुपये परत मिळावे म्हणून कमलाकर यांनी आरोपीला त्याची वडिलोपार्जित १० एकर शेती विकण्यास सांगितले होते. कारागृहात असेपर्यंत तुम्हीच विका, तुम्हीच ठरवा. माझी कुठे सही पाहिजे ते सांगा, असे म्हणणाऱ्या आरोपी विवेकने कारागृहातून बाहेर पडताच शब्द फिरवला. शेती विकण्यासाठी टाळाटाळ करतानाच वेगवेगळे बहाणे करीत होता. शेती विकण्याऐवजी त्याने एका जणाला मक्त्याने दिली. त्यातून मिळणाऱ्या रकमेतून परतफेड करील असे विवेक म्हणायचा. पाच लाखांची रक्कम अशा प्रकारे परत करण्यास खूप वर्षे निघून जातील, मला पैशाचे काम आहे, असे म्हणत कमलाकर आरोपी विवेकवर दबाव टाकत होते. त्यातून त्यांच्यात वादाची ठिणगी पडली. कमलाकरने हा विषय आपल्या पक्षातील काही जवळच्या पदाधिकाऱ्यांनाही सांगितला होता. मात्र, घरगुती विषय असल्याने त्यात कुणी हस्तक्षेप करण्याची तसदी घेतली नाही.

या पार्श्वभूमीवर, रविवारी रात्री आरोपी त्याच्या स्प्लेंडरने (एमएच 40/ 5709) कमलाकर यांच्या घरी आला. रात्री जेवणादरम्यान पुन्हा पैशाचा विषय निघाला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर कमलाकर, पत्नी अर्चना आणि वेदांती तसेच चिमुकल्या कृष्णाला घेऊन शयनकक्षात झोपले. वृद्ध मिराबाई, वैष्णवी, मिताली या तिघी हॉलमध्ये खाली झोपल्या. तर, नराधम विवेक हॉलमध्येच दिवाणवर पडला. मध्यरात्र उलटल्यानंतर विवेकमधील सैतान जागा झाला. त्याने घरातील लोखंडी टोकदार जाडजूड बत्ता घेऊन एकापाठोपाठ कमलाकर, पत्नी अर्चना आणि वेदांती तसेच चिमुकल्या कृष्णा या सर्वांच्या डोक्यात वार केले. गाढ झोपेत असलेल्या कुणालाच साध्या प्रतिकाराचीही संधी या नराधमाने दिली नाही. त्यांच्या किंकाळ्या ऐकून वृद्ध मीराबाई झोपेतून उठल्या. त्यांनी कमलाकरच्या खोलीमध्ये पाहिले असता त्यांना हा सैतान चौघांचेही डोके ठेचताना दिसला. ते पाहून मीराबाई किचनच्या दाराकडे पळाल्या. तर, नराधमाने लगेच त्यांना ओढून खाली पाडून त्यांच्याही डोक्यात बत्त्याचे घाव घालून त्यांनाही ठार मारले. त्यानंतर तो पळून गेला. नंदनवन पोलीस आणि गुन्हे शाखेची पथके आरोपीचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी आरोपीचा छडा लावण्यासाठी घटनास्थळी ठसे तज्ज्ञ, श्वान पथक बोलवून घेतले. श्वानाने घरातील आतल्या भागाचा कानोसा घेतला. त्यानंतर घराच्या बाजूला असलेल्या रिकाम्या जागेत बराच वेळ घुटमळल्यानंतर रिंगरोड टी पॉर्इंटपर्यंत गेला आणि तेथून काही अंतर इकडे तिकडे फिरल्यानंतर पुन्हा कमलाकर यांच्या घराकडे परतला.

मिताली झाली पोरकी
नागपुरातील पवनकर हत्याकांडातील आरोपी विवेक याची मुलगी 7 वर्षीय मिताली पोरकी झाली आहे. चार वर्षापूर्वी वडिलांनी तिच्या आईची हत्या केली होती. त्यामुळे लहान भाऊ व मिताली मामाच्या आसऱ्याने नागपूरला राहत होते. मात्र रविवारच्या मध्यरात्री क्रूरकर्म्याने हा शेवटचा आधारही हिरावून घेतला.

आरोपी हा कमलाकर पवनकर यांचा साळा होता. आरोपी विवेक याचा स्वभाव विक्षिप्त स्वभावाचा होता. त्याने कशाचाही विचार न करता 2014 मध्ये पत्नीचाही खून करून दोन मुलांना वाऱ्यावर सोडले होते. आईचा मृत्यू आणि वडील कारागृहात असल्यामुळे पोरके झालेल्या मिताली व तिचा भाऊ क्रिष्णा यांना कुणीही जवळ केले नाही. अशावेळी कमलाकर व अर्चना यांनी या मुलांना आधार दिला. पण या विकृत प्रवृत्तीच्या विवेकने उपकाराची परतफेड अशी अपकाराने केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत