क्रिकेटचा देव झाला ‘पुलं’कित

पुणे : रायगड माझा वृत्त

एक अवघ्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व आणि साहित्यातील दैवत, तर दुसरा क्रिकेटचा देव… एक आपल्या दिलखुलास आणि आनंदी स्मृतींनी आजही अनेकांच्या चेहऱ्यांवर हास्यलकेर फुलवणारा, तर दुसरा आपल्या निवृत्तीनंतरही तेवढ्याच उत्साहात उद्याच्या ‘मास्टर ब्लास्टर्स’च्या स्वप्नांत बळ फुंकणारा… महाराष्ट्राला लाभलेली ही दोन

नितांतसुंदर व्यक्तिमत्त्वे एका प्रतीकात्मक अर्थाने शुक्रवारी एकमेकांना भेटली आणि निखळ आनंदाचे अन् ऊर्जेचे एक विलक्षण वातावरण उपस्थितांना अनुभवता आले…

ज्यांनी महाराष्ट्राला भरभरून हसवले आणि जगण्यावर प्रेम करायला शिकवले, अशा पु. ल. देशपांडे अर्थात पुलंच्या पुण्यातील घरी- ‘मालती-माधव’मध्ये सचिन तेंडुलकरचे आगमन झाले, त्या वेळी हा आनंदानुभव अनेकांना घेता आला. यंदा पुलंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त साजऱ्या होणाऱ्या पुलोत्सवाच्या पूर्वसंध्येस सचिनने पुलंच्या घरी भेट दिली. ज्यांना बघत सचिन लहानाचा मोठा झाला आणि ज्यांच्याविषयी बालपणी त्याला नेहमीच उत्सुकता असायची, अशा पुलंच्या प्रतिमेला नमस्कार करत त्याने त्यांच्या आठवणी या वेळी जागवल्या. शिवाय, आपले पिताजी प्रा. रमेश तेंडुलकर आणि पु. ल. देशपांडे यांच्यातील स्नेहाविषयीही तो भरभरून बोलला.

आज पुलंच्या घरी येऊन मी भारावून गेलो असून मला माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्द सापडत नाहीत, असेही मास्टर ब्लास्टर आवर्जून म्हणाला. स्वतः गाडी चालवत आलेल्या सचिनने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. कुठलाही अभिनिवेश न बाळगता अतिशय विनयशीलतेने सचिन पुलंविषयी बोलत होता. पुलंच्या घरी काही वेळ घालवताना त्याने बेसनाचा लाडू आणि दिवाळी फराळाचा आस्वादही घेतला.

या वेळी झालेल्या अनौपचारिक कार्यक्रमात ‘आय लव्ह पुलं (मी पुलं प्रेमी)’ या कार्यक्रमाच्या लोगोचे आणि पुलोत्सव पुणेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे, दिनेश व ज्योती ठाकूर, ‘आशय सांस्कृतिक’चे सतीश जकातदार, विरेंद्र चित्राव आदी उपस्थित होते.

पुलं आणि ब्रॅडमन!
सचिनने या भेटीत ब्रॅडमन यांचीही आठवण जागवली. क्रिकेटमधील माझे आदर्श सर डॉन ब्रॅडमन यांच्या ९८ व्या वाढदिवशी मी त्यांच्या घरी ऑस्ट्रेलियात गेलो असताना माझ्या मनात ज्या भावना होत्या, तशीच काहिशी अवस्था माझी आज पुलंच्या घरी येऊन झाली आहे, असे त्याने या वेळी सांगितले. माझ्यात आणि पुलंमध्ये समान धागा होता ‘सी फूड’चा! आम्हा दोघांच्याही सी-फूड खूप आवडीचे आहे, असेही तो म्हणाला.

… आणि घेतला पुलंचा ऑटोग्राफ
सचिन म्हणाला, ‘माझे बाबा आणि पुलं देशपांडे खूप चांगले मित्र होते. मी पाच-सहा वर्षांचा असताना पुलंना पहिल्यांदा पाहिले. त्या वेळी मी मोठ्या उत्साहाने त्यांची सही घेतल्याचे मला आठवते. पुलं आणि बाबा दोघांमध्ये पत्रव्यवहारही होत होता. मी पाच-सहा वर्षांचा असेन, त्या वेळी वांद्रे येथील साहित्य सहवास कॉलनीत पुलं आले होते. तेव्हा मी त्यांना पहिल्यांदा भेटलो. मोठ्या उत्साहाने रांगेत उभा राहून मी त्यांची सही घेतली. त्या वेळी मला भारावल्यासारखे झाले होते. त्यानंतरही मी त्यांना भेटलो, तेव्हा अतिशय चांगला अनुभव होता.

पुलं म्हटले की ओठांवर नेहमीच हसू फुलते. त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वसामान्य माणसाशी जोडलेले होते. पुलंच्या समयसूचक विनोदाचे काय सांगणार? सूर्य किती प्रकाशमान असतो, हे सांगायची गरज नसते… पुलं तसे होते. आधीच्या पिढीला त्यांना प्रत्यक्ष पाहता आले. त्यांचा आनंद घेता आला, हे त्यांचे भाग्यच. आज त्यांच्या घरी येणे हे मी माझे भाग्यच समजतो. मी आज निःशब्द झालोय. पुलं नेहमीच साजरे होत राहावेत, एवढेच मी म्हणेन… – सचिन तेंडुलकर

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत