क्रिकेटपटू इम्रान खान यांनी घेतली पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची शपथ

इस्लामाबाद: रायगड माझा वृत्त

पाकिस्तानच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी शनिवारी पाकिस्तानच्या २२ व्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. काळ्या रंगाची शेरवानी परिधान केलेल्या इम्रान यांनी उर्दूतून शपथ घेतली. काँग्रेस नेते व माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू यांच्यासह अनेक माजी आणि विद्यमान क्रिकेटपटू या सोहळ्याला उपस्थित होते. अत्यंत साध्या समारंभात हा शपथविधी सोहळा पार पडला.

Image result for imran khan

इम्रान यांचा पक्ष २५ जुलैला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागांवर निवडून आला, पण पक्षाकडे बहुमत नव्हते. शुक्रवारी पाकिस्तानी संसदेत इम्रान खान यांना १७६ मते मिळाली आणि लहान पक्षांच्या आधारे बहुमतापर्यंत जेमतेम पोहोचत अखेर इम्रान यांचा पंतप्रधानपदाचा मार्ग मोकळा झाला.

इम्रान यांच्या शपथविधी सोहळ्याला सैन्याचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इम्रान यांची तिसरी पत्नी बुशरा ऊर्फ पिंकी पीर यादेखील यावेळी उपस्थित होत्या. त्या सतत हातातली माळ जपत होत्या. दरम्यान, लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांनी यावेळी नवज्योत सिंह सिद्धू यांची भेट घेऊन बराच वेळ संवाद साधला. ‘पाकिस्तानच्या प्रत्येक नागरिकाला इम्रानकडून आशा आहे. पाकिस्तानचेच नव्हे तर भारतातले लोकही याकडे सकारात्मक नजरेने पाहत आहेत. पाकिस्तानला वर्ल्ड कप जिंकून देणारे इम्रान खान पंतप्रधानपदाची इनिंगही यशस्वीपणे पूर्ण करतील, अशी आशा आहे,’ अशी प्रतिक्रिया सिद्धू यांनी व्यक्त केली.

इम्रान खान यांनी १९९६ मध्ये ‘तहरीक-ए-इन्साफ’ पक्ष स्थापन केला. २००७ मध्ये हा पक्ष प्रमुख विरोधी पक्ष बनला. २०१३ मध्ये ते निवडणूक जिंकून पाकच्या संसदेत पोहोचले. न्यायासाठी आणि भ्रष्टाचाराविरोधातल्या लढ्यासाठी पक्ष स्थापनेचे इम्रान यांचे उद्दिष्ट होते. नंतर २०१८ च्या निवडणुकांमध्ये त्यांनी नव्या पाकिस्तानची घोषणा केली आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर निशाणा साधला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत