क्रिकेट खेळत असतानाच खेळाडूचा मृत्यू

मडगाव (गोवा) : रायगड माझा ऑनलाईन

क्रिकेट खेळत असतानाच हृदयविकाराचा झटका येऊन क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.  राजेश घोडगे (वय ४७)असे त्यांचे नाव आहे.  ते गोव्याचे माजी रणजी क्रिकेटपटू होते. मडगाव क्रिकेट क्लबच्या सदस्यांसाठी आयोजित केलेल्या सामन्यामध्ये खेळत असताना राजेश घोडगे नॉन स्ट्राईकवर होते. त्याचवेळी त्यांना हृदविकाराचा झटका येऊन कोसळले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या पार्थिवावर सोमवारी (दि.14) सकाळी पाजीफोंड येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार  आहेत.

सदर घटना दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास घडली. मडगाव क्रिकेट क्लबतर्फे आयोजित सामन्यात ते  खेळत होते. नॉन स्ट्राईक एंडवर असताना राजेश यांच्या छातीत अचानक दुखू लागल्याने ते खेळपट्टीवरच कोसळले. त्यांना जवळच असलेल्या इएसआय इस्पितळात दाखल करण्यात आले.तिथून त्यांना तातडीने व्हिक्टर इस्पितळात हलविण्यात आले. पण तेथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

मडगाव क्रिकेट क्लब दरवर्षी आपल्या सदस्यांसाठी क्रिकेट सामना आयोजित करते. यंदा रविवारी हा सामना डॉ.राजेंद्र प्रसाद स्टेडियमवर आयोजत करण्यात आला होता. यात क्लबचे आजी-माजी सदस्य सहभागी झाले होते. यात अनेक डॉक्टर्सचाही समावेश होता. खेळपट्टीवर कोसळलेल्या घोडगे यांची तेथे उपस्थित डॉक्टरांनी तातडीने तपासणी केली. पण त्यांची स्थिती बिघडत चालल्याचे पाहून त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले.

राजेश घोडगे चार दिवसांपूर्वी गोवा क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या स्पर्धेत कुडचडे जिमखानातर्फे खेळले होते. या सामन्यात त्यांनी अर्धशतक झळकावले होते. एक तडाखेबाज फलंदाज म्हणून ते प्रसिद्ध होते. दोन रणजी सामन्यांत ते खेळले होते.

राजेश यांच्या पश्‍चात पत्नी डॉ. रेखा आणि लहान मुलगी असा परिवार आहे. मडगावच्या नगरसेविका शरद प्रभुदेसाई यांचे ते जावई होत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत