क्रॉफर्ड मार्केटच्या पुनर्विकासात चिनी वस्तूंची तब्बल ७३ दुकाने

मुंबई : रायगड माझा 

फोर्ट येथील महात्मा जोतिबा फुले मंडईचा (क्रॉफर्ड मार्केट) पुनर्विकास करण्यात येत आहे. अत्याधुनिक होणार्‍या या मार्केटमध्ये मासळी बाजारासह अन्य दुकानेच नाही, तर चक्क चायना वस्तू विकण्यासाठी 73 दुकाने बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे चायना वस्तूंवर बहिष्कार टाकण्यासाठी आग्रही असलेल्या केंद्र व राज्य सरकारलाच मुंबई महापालिकेने अडचणीत आणले आहे.

परदेशी मार्केटच्या धर्तीवर पालिकेने क्रॉफर्ड मार्केटचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण वातानुकूलित असलेल्या या मार्केटसाठी तब्बल 210 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. पहिल्या मजल्यावर पाळीव प्राणी व पक्षी यांच्यासाठी स्वतंत्र 61 दुकाने बांधण्यात येणार आहेत. दुसर्‍या मजल्यावर मंडई कार्यालयसह उपहारगृह व अन्य कार्यालये असणार आहेत. ब्लॉक क्रमांक 2 मध्ये बीफ मंडई, ब्लॉक क्रमांक 3 मध्ये वाहनतळासह घाऊक मासळी विक्रेते, किरकोळ मासळी विक्रेते, झुणका भाकर केंद्र अंडी व मटण विक्रेते 185 चौरस फुटाची 85 दुकाने व ब्लॉक क्रमांक 4 मधील पहिल्या मजल्यावर 190 चौरस फुटाची 78 दुकाने व दुसर्‍या मजल्यावर खास चायना वस्तू विकण्यासाठी 73 दुकाने बांधण्यात येणार आहेत.

पालिकेने चायना वस्तू विकण्यासाठी दुकांने बांधण्यासाठी पुढाकार घेतल्यामुळे अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला आहे. पण यावर स्थायी समितीत एकाही सदस्यांनी जाब विचारला नाही. विशेष म्हणजे या प्रस्तावाला भाजपा विरोध करेल असे वाटत होते, पण भाजपाचा एकही सदस्य चायना मार्केटबद्दल बोलला नाही. एकीकडे चायना वस्तूवर बंदी घालण्याचा सरकार विचार करत असताना, दुसरीकडे देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईमध्ये चायना वस्तू विकण्यास अधिकृत जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबत पालिकेच्या बाजार विभागातील अधिकार्‍यांना विचारले असता, त्यांनी यावर बोलणे टाळले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत