खटला मागे घेण्यावरून युवकाचा खून

सातारा : रायगड माझा 

न्यायालयात सुरू असलेली तक्रार मागे घेत नाही म्हणुन सातारा शहरातील मंगळवार तळे या वर्दळीच्या ठिकाणी शनिवारी मध्यरात्री संदीप रमेश भणगे वय 35 रा.व्यकंटपुरा पेठ, सातारा या युवकाचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे.आरोपीने केलेल्या हल्ल्यात संदीप भणगे हा गंभीर जखमी झाला होता. दरम्यान त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळातच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.

संशयित आरोपी व त्याच्या 7 ते 8 मित्रांनी 2012 मध्ये संदीप याला किरकोळ वादातून मंगळवार पोलिस चौकीजवळ मारहाण करून त्याच्या हाताची बोटे व डावा पाय मोडून गंभीर जखमी केले होते. त्यामुळे मयत संदीप याने आरोपी व त्याच्या मित्रांच्या विरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात दरोडा व मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. दाखल गुन्ह्याची जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्याकरीता दोन दिवसापुर्वी संदीप त्याच्या एका मित्रासोबत न्यायालयात गेला असताना संशयीताने न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची तक्रार मागे घे , नाहीतर तुला महागात पडेल असा दम दिला होता. तरीही संदीप तक्रार मागे घेत नसल्याने संशयित प्रसाद प्रकाश कुलकर्णी उर्फ पायलट याने शनिवारी मंगळवार तळे परिसरातील एका बझारच्या समोर रात्री आकराच्या सुमारास संदीप याला अडवून तक्रार मागे का घेत नाहीस म्हणत दमदाटी करण्यास सुरवात केली.

त्यावेळी संदीप याने तक्रार मागे घेण्यास नकार दिल्याने प्रसाद याने हातातील लोखंडी गजाने त्याच्या डोक्‍यात व पाठीवर मारहाण केल्याने संदीप गंभीर जखमी झाला होता.त्याला उपचारासाठी तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र काही वेळातच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगीतले. अशी तक्रार संदीप याचे वडील रमेश विठ्ठल भणगे रा. व्यकंटपुरा पेठ,सातारा यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली असुन त्याचा तपास पो.नि. किशोर धुमाळ करत आहेत.
खून झाल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत, मृत युवकाची माहिती घेऊन मारेकऱ्याच्या शोधासाठी पथके रवाना केली होती .खुनाच्या घटनेनंतर अवघ्या काही तासातच याप्रकरणी प्रसाद प्रकाश कुलकर्णी वय 32 रा. व्यंकटपुरा पेठ,सातारा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अन् प्रसादने ठोकली धूम 
शनिवारी रात्री 11 च्या सुमारास प्रसाद कुलकर्णी हा संदीप याला तक्रार मागे घेण्यासाठी दमदाटी करून लोखंडी गजाने मारहाण करत होता. दरम्यान त्याचवेळी सकाळी घरातून गेलेला संदीप रात्र झाली तरी घरी परतला नसल्याने त्याला पाहण्यासाठी संदीपचे वडील रमेश आले होते . त्यांना पाहताच संशयीत प्रसाद याने धुम ठोकल्याचे फिर्यादीत नमुद केले आहे.

…तर घटना टळली असती
संशयीत आरोपी प्रसाद कुलकर्णी याने दोन काही दिवसापुर्वी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एका युवकाला जबर मारहाण केली होती. त्याची तक्रार देण्यासाठी मारहाण झालेला युवक व त्याचा मित्र सातारा शहर पोलिस ठाण्यात आले होते. मात्र तिथे असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. जर त्या दिवशी मारहाणीची तक्रार घेतली असती तर संदीप भणगे याच्या खुनाची घटना टळली असती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत