खटारा  पुन्हा शेकापच्या दिमतीला

रायगड माझा वृत्त 

विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा खटारा चिन्ह मिळणार आहे. खटारा हे निवडणूक चिन्ह १९९५ साली निवडणूक आयोगाने गोठवले होते, मात्र आता पुन्हा हे चिन्ह दिल्याचे पत्र शेतकरी कामगार पक्षाला प्राप्त झाले आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसच्या राजकारणाला विरोध म्हणून झाली. शेतकरी कामगार पक्षाची सगळी भिस्त शेतकरी आणि कामगार या श्रमिकांच्यावर होती.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भावणारे चिन्ह म्हणून शेकापने खटारा हे निवडणूक चिन्ह मिळवले. त्यानंतर १९९० पर्यंत शेकापने याच चिन्हावर निवडणुका लढवल्या. १९९५ साली निवडणूक आयोगाने हे चिन्ह गोठवले. त्यानंतर कपबशी , नारळाचे झाड अशी अनेक चिन्ह घेऊन शेतकरी कामगार पक्षाने निवडणूक लढविल्या .२०१४ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाला खटारा चिन्ह मिळाले होते,पण त्याच स्वरूप तात्पुरते होते . मात्र आता निवडणूक आयोगाने शेतकरी कामगार पक्षाला खटारा हे त्यांचे अधिकृत चिन्ह असेल असे एका पत्राद्वारे कळविले आहे. चिन्हाच्या संभ्रमावस्थेमुळे शेतकरी कामगार पक्षाला अनेक निवडणुकीत फटका देखील बसला . खटारा आणि शेकाप हे खूप वर्ष समीकरण होते . शेकापच्या परंपरागत मतदारांवर हे चिन्ह बिंबविले गेले होते. त्यामुळे आता हे चिन्ह परत मिळाल्या बद्दल शेकापच्या गोटात आनंद व्यक्त होत आहे.मात्र अलीकडच्या काळात शहरी भागातील मतदार शेकाप पासून फारकत घेताना दिसत असताना त्यांना शेतकरी कामगार पक्षाचे खटारा चिन्ह कितपत प्रभावित करेल हे आगामी काळात समजेल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत