खरसई बस अपघात : वीस दिवसांनंतरही अपघातग्रस्त सुनील गायकर मदतीच्या प्रतीक्षेत

एसटी महामंडळाचे अधिकारी दवाखान्यात फिरकलेच नाहीत;

ग्रामस्थांनी पैसे जमा करून दिल्यानंतर झाला ऑपरेशन

म्हसळा : निकेश कोकचा

म्हसळा तालुक्यातील खरसई ग्रामपंचायत हद्दीत २८ एप्रिल रोजी झालेल्या दोन बसच्या समोरासमोरील अपघातामध्ये गंभीररीत्या जखमी असलेल्या सुनील गायकर हा अद्याप एसटी महामंडळ मदत करेल या प्रतीक्षेत डोळे लाऊन आहे.मात्र एसटी महामंडळातील बेजबाबदार अधिकारी अपघातानंतर रुग्णांना दाखल करण्यात आलेल्या दवाखान्यात मदत तर नाही पण विचारपूस करण्यासाठी देखील आले नसल्याने गायकर कुटुंबाचा शासनावरील भरवसा उठला आहे.
२८ एप्रिल रोजी म्हसळा तालुक्यातील खरसई ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये दुपारी ०२:३० वाजल्याच्या सुमारास श्रीवर्धन बोर्ली नालासोपारा ही एसटी बस आली असता समोरून येणाऱ्या नालासोपार बोर्ली श्रीवर्धन या जादा गाडीच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला होता.या अपघातामध्ये ५ जण गंभीररीत्या जखमी झाले होते.जखमींना पुढील उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.या या गंभीर रुग्णांमध्ये श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन जवळील वांजळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत राहणाऱ्या सुनील गायकरचाही समावेश होता.सुनील गायकरचे वय अवघे ३५ वर्षे आहे.त्याला तीन चिमुकल्या मुली सुद्धा आहेत. या बस अपघातामध्ये त्याचा संसार उध्वस्त झाला असून जखमी झालेल्या सुनीलचा हात डॉक्टरांच्या सल्ल्यांनी कापण्यात आला.पायावरही मोठ्याप्रमाणात इजा झाल्याने ऑपरेशन करण्यात आले.बसचा अपघात होऊन सुनील जखमी झाल्याने रुग्णालयातील सर्व खर्चाची जबाबदारी एसटी महामंडळाने घेतली पाहिजे होती.मात्र वीस दिवस उलटल्यानंतरही एसटी महामंडळातील बेजबाबदार अधिकारी अपघातग्रस्तांना पाहण्यासाठी दवाखान्यात फिरकलेच नसल्याने गायकर कुटुंबाचा शासनावरील भरवसा उठला आहे.
  • ग्रामस्थ ठरले देवदूत
सुनील गायकर याची परिस्थिती हलाकीची असल्याने त्याच्या पुढील उपचारासाठी वांजळे गावातील उप सरपंच विलास दर्गे,ग्रामस्थांनी व मित्र परिवारांनी पैसे जमा करून दिल्याने सुनीलचा ऑपरेशन झाला.यामळे त्याच्या मूळ गावातील ग्रामस्थ त्याच्यासाठी देवदूत ठरले आहेत.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत